Friday, November 22, 2024

डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून खून प्रकरण; दोन सख्ख्या भावांसह तिघांना जन्मठेप; नांदेड न्यायालयाचा निकाल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना 2018 मध्ये माहूर तालुक्यात घडली होती. याप्रकरणी नांदेड न्यायालयाने दोन सख्ख्या भावांसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जुन्या वादातून एकाचा खून करून इतर एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना येथील न्यायाधीश अशोक धामेचा यांनी गुरुवार दिनांक 7 जुलै रोजी जन्मठेप व रोखदंडाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण गोकुळगाव, तालुका माहूर येथील आहे.

माहूर तालुक्यातील गोकुळगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात ठेवून नऊ सप्टेंबर 2018 च्या सायंकाळी पाचच्या सुमारास आठ जणांच्या गटाने दोघांवर हल्ला चढवला. यात आनंद केशव भगत याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकले. यात त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या समवेत असलेला सदानंद मुकिंदा भगत याच्यावरही प्राणघातक हल्ला केला. मात्र तो या हल्ल्यातून बचावला.

घटनेच्या सायंकाळी पाचच्या सुमारास गावातील बुद्धभूषण गुलाब भगत, सतीश कांबळे, हर्षवर्धन मंडल, भूषण कांबळे, आदर्श कांबळे, संतोष नगराळे, किरण भगत हे गोकुळगाव येथील डॉक्टर आंबेडकर चौकात बोलत बसले होते. त्यांच्यासमवेत आनंद भगत आणि सदानंद भगत हेही उपस्थित होते. यावेळी या दोघांवर  हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे प्रितेश विजय मानकर (वय 27) सतीश विजय मानकर (वय 28), रुपेश विजय मानकर (वय 32), देवानंद नथू भगत ( वय 46), गौतम नथू भगत (वय 56), विजय एकनाथ मानकर ( वय ५०), कमुबाई विजय मानकर (वय 45) आणि निर्मला गौतम भगत (वय 50) यांनी संगणमत करून आणि कट रचून आनंद भगत याचा खून केला. आणि सदानंद भगत याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी किशन आनंद भगत यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात भादंविच्या 302, 307, 120 (ब), 143, 147, 148, 149 आणि 323 तसेच भारतीय हत्यार कायदा प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी या आठही आरोपींना अटक केली होती. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने बारा साक्षीदार तपासले. यात जखमी फिर्यादी यांचे बयान आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. जिल्हा सरकारी वकील आशिष गोधमगावकर यांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी प्रितेश विजय मानकर, सतीश विजय मानकर आणि देवानंद नथू भगत यांना 302 अंतर्गत जन्मठेप, 307 अंतर्गत 10 वर्ष सक्त मजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. बाकी पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!