ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- उमरी तालुक्यातील सिंधी येथील कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेवर चोरट्यांनी काल शनिवार दि. 1 आक्टोबर रोजी दिवसा दरोडा टाकून दोन लाख रुपये लुटल्याची घटना घडली. रविवार दि. 2 आक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी गोळीबार करत एका दरोडेखोराला अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दि. 1 आक्टोंबर रोजी सिंधी ता.उमरी जि.नांदेड येथे काँग्रेसचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन मोटर सायकलवरून आलेले सहा दरोडेखोर अचानक पतसंस्थेच्या आँफीसमध्ये घुसले. हातातील तलवार कँशिअरच्या गळ्याला लावून दोन लाख रुपये घेऊन पसार होत असताना एका मोटार सायकलवर बसून दरोडेखोराने गाडी काढताच पाठीमागून कर्मचाऱ्याने दरोडेखोराच्या पाठीवर दगड मारला. यात दरोडेखोरांची गाडी खाली पडताच मंजीतसिंग किसनसिंग सिरपल्लीवाले या दरोडेखोरास कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन पकडले होते. बाकीचे दरोडेखोर मात्र ऊसाच्या फंडातून पळ काढत पसार झाले. घटनेची माहिती समजताच उमरी स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मोठा जमाव जमा झाला होता.
सिंधी येथे व्हीपीके समूहाचा गुळपावडरचा कारखाना आहे. या कारखान्यात शेकडो कर्मचारी काम करतात त्यांचे पगार व शेतकऱ्यांच्या उसाचे लाखो रुपयांचे पेमेंट येथे केले जात असते. यातीलच रकमेची लूट करण्यात आली. उमरी पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या प्रकरणात तपासाचे चक्र वेगाने फिरवत सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने व त्यांचे सहकारी संजय जिंकलवाड, मोतीराम पवार, हेमंत बिचकेवाड यांच्या पथकाला कडक गस्त घालण्याचे आदेश दिले होते. आज पहाटे या पथकास नांदेड शहराजवळील पुणेगावकडून येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने दुचाकीवर दोघे जण जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी लगेच त्यांचा पाठलाग सुरू केला.
पण आरोपी थांबतच नसल्याने अखेर पांडुरंग माने यांनी गोळीबार करत बालाजी संभाजी महाशेट्टे (वय 21) राहणार धनज, तालुका मुदखेड याला अटक केली. त्याच्या पायाला गोळी लागली असून रात्रीने त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र एक जण पसार झाला. अटक केलेल्या बालाजी महाशेट्टे याच्याकडून रोख रक्कम जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे यांनी या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी- कर्मचारी आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻