ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ कर्मचाऱ्यांनी चालाखीने एकास पकडले
◆ उमरी तालुक्यातील सिंधी येथील कै.व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थेवर दरोडा
उमरी (जि. नांदेड)- कर्मचाऱ्यांवर तलवारी उगारून तालुक्यातील सिंधी येथील कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेवर भरदिवसा दरोडा टाकून तीन लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. आज शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.
सिंधी ता.उमरी जि.नांदेड येथे कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन मोटर सायकलवरून आलेले सहा दरोडेखोर अचानक पतसंस्थेच्या ऑफीसमध्ये घुसले आणि हातातील तलवार उगारल्या, यातील एकाने कँशिअरच्या गळ्याला तलवार लावून तीन लाख रुपये घेतले. हे दरोडेखोर पसार होण्यासाठी एका मोटार सायकलवर बसून गाडी काढताच पाठीमागून एका कर्मचाऱ्याने दरोडेखोराच्या डोक्यात दगड फेकून मारला. हा दगड मारताच दरोडेखोरांची गाडी खाली पडून एक दरोडेखोरही खाली कोसळला, कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन त्यास पकडले आणि त्यास बेदम चोप दिला. बाकीचे दरोडेखोर मात्र ऊसातून पळ काढत पसार झाले.
घटनेची माहिती समजताच उमरी स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मोठा जमाव जमा झाला होता. सिंधी येथे व्हीपीके समूहाचा गुळपावडरचा कारखाना आहे. या कारखान्यात शेकडो कर्मचारी काम करतात त्यांचे पगार व शेतकऱ्यांच्या उसाचे लाखो रुपयांचे पेमेंट येथे केले जाते. ही पतसंस्था काँग्रेस नेते तथा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली चालवली जाते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻