ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– जिल्हा व शहरातील तृतीयपंथीयांनी भिक्षा मागण्यापेक्षा आपले हक्क समजून घेऊन उद्योगाकडे वळावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी केले. न्यायाधीश रोटे हे हजूर साहिब रेल्वेस्थानकावर तृतीयपंथीयांसाठी आयोजित केलेल्या कायदेविषयक शिबिरात सोमवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी बोलत होते.
यावेळी रेल्वेस्थानक व्यवस्थापक कालीचरण, लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिर्झा, रेसुबचे निरीक्षक अमित उपाध्याय, अँड. सुभाष भेंडे, ऍड. पठाण, पत्रकार ऍड. प्रल्हाद कांबळे यांची उपस्थिती होती.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या आदेशावरून शिबिरात बोलताना न्यायाधीश रोटे म्हणाले की, तृतीयपंथीयांच्या ज्या अडचणी आहेत त्या शासन दरबारी सोडविण्यासाठी मी मागील तीन वर्षापासून सतत प्रयत्न करत आहे. महत्त्वाचा मुद्दा त्यांना स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याशी चर्चा करून हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून येत्या मे अखेरपर्यंत तृतीयपंथीयांना हक्काची स्मशानभूमी मिळेल असे आश्वासन दिले. तृतीयपंथीयांनी भिक्षा मागण्यापेक्षा उद्योगाकडे वळावे. शिक्षित असलेल्या तृतीयपंथीयांनी सेतू केंद्र व अन्य उद्योग सुरू करावे त्यांच्या पाठीमागे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण खंबीरपणे उभे असल्याचे श्री. रोटे यांनी सांगितले.
यावेळी स्टेशन व्यवस्थापक कालीचरण, पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, अमित उपाध्याय, आरोग्य अधिकारी यांनीही तृतीयपंथीयांना व अन्य कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी तृतीयपंथीयांचे प्रमुख गौरी देवकर हिने त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्हा प्रशासन आणि न्यायालयाकडून मिळणारी मदत या आधारावरच आम्ही चांगले जीवन जगत असल्याचे सांगितले. त्यांनी न्यायाधीश रोटे यांचे मायबाप सरकार म्हणून तोंड भरून कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻