Friday, November 22, 2024

दंगल प्रकरण: ५ वर्षांची शिक्षा झालेल्या ठाकरे गटाच्या माजी आमदार, जिल्हाप्रमुखांसह १२ जणांना हायकोर्टाकडून जामीन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ नेत्यांसह शिवसैनिकांच्या मदतीला “मातोश्री”

नांदेड- सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा न्यायालयाने दिलेल्या ५ वर्षांची शिक्षा सुनावल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या माजी आमदार, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख यांच्यासह शिवसैनिकांना छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठाने आज सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या सर्व नेते आणि शिवसैनिकांसाठी “मातोश्री” धावून आली. पक्षाने १५ जणांची दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली.

संबंधित बातमी 👇🏻

माजी आमदार अनुसयाताई खेडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, माजी सभापती नरहरी वाघ यांच्यासह १९ जणांना मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्त्त मजुरी आणि प्रत्येकी एक लाख ६० हजार ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसयाताई खेडकर यांनी पक्षाच्या आदेशावरून महागाई विरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली सात जून २००८ रोजी हिंसक वळण लागले. यावेळी  आंदोलनकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या (एम एच २० डी ५९ १७), (एम‌एच २०डी ७३४८), (एमएच २० डी ६८१२), ( एम‌एच ४०-  ९६२३), एमएच ४० – ८१२५), (एम एच २० डी ५१७३) आणि महानगरपालिकेची (एमएच २६ एल २७३) या गाड्यांची तोडफोड केली होती.

यावेळी काही पोलीस कर्मचारीही दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर केले होते. एसटी बस चालक हावगीरराव पिंपराळे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 140/ 2008 कलम 353, 332, 341, 147, 148, 143, 149, 427 आणि 336 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम तीनप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. काही आरोपींना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एच. सूर्यवंशी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हे प्रकरण सुरू असतानाच चार वर्षांपूर्वी जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या प्रकरणात उपलब्ध पुराव्या आधारे व साक्षीदारांचे जबाबावरून माजी आमदार अनुसयाताई खेडकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सह संपर्कप्रमुख भुजंग पाटील, माजी सभापती नरहरी वाघ, महेश खेडकर, एडवोकेट दिलीप ठाकूर, व्यंकोबा येडे, बाळगीर गिरी, श्रीकांत पाठक, संदीप छप्परवाल, सुभाष शिंदे, शिवाजी सूर्यवंशी, बाळू तिडके, दौलत पोकळे, नवनाथ भारती, भुजंग कावळे, बालाजी शिंदे, भाया शर्मा, आणि मनोज यादव या 19 जणांना विविध कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख 60 हजार 750 रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर वजिराबाद पोलिसांनी १८ जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची कारागृहात रवानगी केली होती. यानंतर शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणाने “मातोश्री” अर्थात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उभे राहिल्याचे दिसून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ जणांच्या दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यानंतर जामिनासाठी मार्ग मोकळा झाला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचे बंधू उपशहर प्रमुख रमेश पाटील कोकाटे, अंकुश पाटील कोकाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठून उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न केले. ऍडवोकेट डॉ. साहेबराव नांदेडकर यांनी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, नरहरी वाघ, व्यंकोबा येडे पाटील, भुजंग कावळे, दौलत पोफळे, शिवाजी सूर्यवंशी, मनोज यादव, भुजंग पाटील यांच्या वतीने युक्तिवाद केला. तर तिकडे ऍडवोकेट गंगाखेडकर यांनी माजी आमदार अनुसयाताई खेडकर, महेश खेडकर आदींसाठी युक्तिवाद केला.


जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, माजी आमदार अनुसयाताई खेडकर, महेश खेडकर, नरहरी वाघ, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, अँड. दिलीप ठाकूर, दौलत पोफळे, शिवाजी सूर्यवंशी, सुभाष शिंदे आणि मनोज यादव यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती अवचट यांनी जामीन दिला.

आज बारा जणांना जामीन मिळाला. उर्वरित सात जणांना लवकरच जामीन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी जामिनासाठी परिश्रम घेतले. जामीन मिळालेल्या सर्वांची मंगळवारी दिनांक 18 एप्रिल रोजी कारागृहातून सुटका होईल.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!