ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– दुपारच्या वेळी एकट्या महिलांना गाठून सोने व चांदी उजळवून देतो असे आमिष दाखवत चोरटे सोने- चांदीवर डल्ला मारणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार कंधार तालुक्यातील तेलंगवाडी येथील एका 65 वर्षीय महिलेसोबत घडला. तिला दोन भामट्यांनी 29 तोळ्याच्या चांदीचा अपहार करून गंडा घातला. याप्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधारणपणे दुपारी पुरुष मंडळी घरी नसतात आणि त्यातही घरी विशेष करून वृध्द महिला असतात. याचाच फायदा घेत सोने आणि चांदी उजळून देणारी चोरट्यांची टोळी जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे उघडकीस आले आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलंगवाडी ता. कंधार येथील 65 वर्षीय महिला शशिकलाबाई रमेश मुपडे ह्या 21 फेब्रुवारीच्या सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या अंगणात बसल्या होत्या. यावेळी दोन भामटे त्यांच्याकडे गेले. आम्ही आपल्या अंगावरील चांदीच्या बेड्या व दंडकडे उजळवून देतो असे म्हणून त्यांना विश्वासात घेतले. सदर महिलेस विश्वास पटल्याने तिने आपल्या अंगावरील 65 तोळे चांदीच्या बेड्या आणि दंडकडे या भामट्यांच्या स्वाधीन केले. भामट्यांनी त्यास पावडर लावून पाण्यात धूवून 65 तोळे वजनाची चांदी वितळवून 36 तोळे केली. आणि सदर महिलेच्या ताब्यात दिली. 29 तोळे चांदीचे पाणी चोरट्यांनी आपल्या ताब्यात घेऊन वृद्ध महिलेचा विश्वासघात केला.
हा प्रकार सायंकाळी तिचे नातेवाईक घरी आल्यानंतर दंड कड्यांची साईज लहान दिसत असल्याने त्यांनी तिला विचारले. या वेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच शशिकलाबाई मुपडे यांनी उस्माननगर पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध विश्वासघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार श्री भारती करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻