ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
नांदेड– भोकर- किनवट रस्त्यावर मिळालेल्या माहितीवरून फौजदार दत्तात्रय काळे यांच्या पथकाने कारवाई करून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. तर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका मोबाईल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही दोन किमती मोबाईल जप्त केले आहे.
भोकर पोलीस ठाण्याचा हद्दीतून चोरीच्या पाच दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या. पोलिसांनी अनिल उत्तम गवाले (वय 35) राहणार गंगानगर, किनवट याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने भोकर शिवारामध्ये पिंपळगाव रस्त्यावर दुचाकी बेवारस स्थितीत ठेवल्या होत्या. तेथे जाऊन रीतसर पोलिसांनी पंचनामा करून पाच दुचाकी जप्त केल्या, तसेच सदर दुचाकीचे चेसिस व इंजिन नंबर हे शासन प्रचलित पोर्टलवर दाखल करून दुचाकीबाबत खात्री केली असता सदर दुचाकी ह्या भोकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आढळून आल्या. पोलिसांनी भोकर येथील अभिलेखावर खात्री केल्यानंतर आरोपी अनिल गवाले आणि जप्त केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या पाच दुचाकी त्यांची किंमत एक लाख 90 हजार रुपये असा मुद्देमाल भोकर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
मोबाईल चोरटा जेरबंद
दुसर्या घटनेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सय्यद अल्ताफ सय्यद रफिक (वय 28 वर्षे) राहणार हिलालनगर मशिदीजवळ खुदबेनगर, नांदेड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बारा हजार आणि आठ हजार रुपयांच्या किमतीचे दोन मोबाईल असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याची कसून चौकशी केली असता अजून त्याच्याकडून काही दुचाकी आणि मोबाईल जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻