ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या नांदेडमध्ये शासकीय ध्वजारोहण होणार आहे. दरवर्षी नांदेडचे पालकमंत्री यांच्या हस्ते हा ध्वजारोहण कार्यक्रम होत असतो. पण कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप निश्चित झालेले नसल्याने दरवर्षीच्या पालकमंत्र्यांची ध्वजारोहणाची ही जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पार पाडणार आहे.
देश स्वतंत्र झाल्यावरही नांदेडसह मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकचा भाग तत्कालीन हैदराबाद संस्थानातच होता. देश स्वतंत्र झाल्यावरही तब्बल १३ महिने चाललेली निझामशाही १७ सप्टेंबर १९४८ रोजी संपवून या भागाच्या स्वातंत्र्याचे अखेरचे पर्व पूर्ण करण्याच्या ऐतिहासिक घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष उद्या शनिवारी सुरू होत आहे. १७ सप्टेंबर हा तसा मराठवाड्याचा खराखुरा स्वातंत्र्य दिन.
यानिमित्त उद्या यंदा औरंगाबादेतील मुख्य ध्वजारोहणास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नयेत. या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रम
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय दौराही जाहीर झाला असून शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.10 नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.15 वा. मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान, नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती. सकाळी 11.10 वा. मोटारीने नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.15 वा. विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻