ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मालगाडी एका रुळावरून दुसऱ्या रुळावर घसरली
नांदेड/ औरंगाबाद- औरंगाबाद जवळील दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रुळावरून घसरलयाची घटना आज सकाळी घडली आहे. यामुळे नांदेड- मुंबई या रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक पुर्णपणे खोळंबली आहे. या अपघातामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आलेल्या आहेत.
दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे मालगाडीचे रॅक रुळावरून खाली घसरली. यात काही रॅक तर चक्क एका रुळावरून थेट दुसऱ्या रुळावर घसरले. त्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक खोळंबली असून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच औरंगाबाद येथील रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
दिनांक 02.04.2022 ला जालना येथून सुटणारी गाडी संख्या 12072 जालना – मुंबई सी.एस.एम.टी. जनशताब्दी एक्स्प्रेस आणि दिनांक 01.04.2022 ला निझामाबाद येथून सुटलेली गाडी संख्या 11410 निझामाबाद – पुणे गाडी आज रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द करण्यात आलेल्या दोन्ही गाड्या आज दिनांक 2.4.2022 रोजी जालना ते मुंबई आणि जालना ते पुणे विशेष एक्स्प्रेस बनून धावतील. काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून रेल्वे प्रशासन सर्व प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. नरसापूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना शिर्डी येथे जाण्याकरिता बसेसची व्यवस्था करण्यात आली. तसेच काही रेल्वे गाड्यांमध्ये अडलेल्या प्रवाशांसाठी अल्पोपहार , पाणी इत्यादी ची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे सेवा लवकरात लवकर पुर्ववत व्हावी म्हणून रेल्वे प्रशासन सर्व प्रयत्न करीत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी सकाळी या अपघातामुळे रोटेगाव- काचीगुडा पॅसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर, जालना- दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर, नांदेडमार्गे गेलेली निजामाबाद- पुणे पॅसेंजर औरंगाबाद स्टेशनवर, अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळावरून मालगाडीचे एकूण 8 डब्बे घसरले असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी बराच वेळ लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻