ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमधील एका डब्यातील शौचालयात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा खून करण्यात आल्याचे दिसून येत असून सदर प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे नांदेड येथे अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद लोहमार्गचे पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल पगारे, पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मयत महिलेच्या मारेकर्याचा शोध घेणे सुरू केले आहे.
नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस धर्माबाद येथूनप्लॅटफॉर्म क्रमांक चारवर नांदेडला सकाळी सात वाजता आली. यावेळी गाडीची साफसफाई करताना डी- 8 या बोगीच्या शौचालयात अंदाजे 30 वर्षे वयोगट असलेल्या महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडावर आणि शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून येत होते. ही माहिती लोहमार्ग पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. हवालदार जीवराज लव्हारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पंचनामा करून सदरचा मृतदेह शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केला आहे. सध्या मृतदेह शवागारात राखीव ठेवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल पगारे यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पोलीस निरीक्षक उनवणे यांना तपासाच्या योग्य सूचना दिल्या. सदर महिला ही नेमकी कोण आहे आणि कुठली आहे तसेच तिचे मारेकरी कोण? याचा शोध लोहमार्ग पोलीस घेत आहेत. मात्र घडलेल्या घटनेमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻