ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•लाखोंची फीस वसुली; कोणतीही परवानगी नसताना शाळा सुरु
•किड्स किंगडम या प्रतिष्ठित शाळेऐवजी त्याच भव्य इमारतीत सुरु आहे बोगस शाळा
नांदेड (विशेष प्रतिनिधी)- शहरात चक्क बोगस शाळा चालवून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मोठी शैक्षणिक संस्था आणि मोठी शाळा असा नावलौकिक असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल यांच्याकडून बोगस शाळा चालविण्याचा हा प्रकार केला जात आहे.
नांदेड शहराला लागूनच असलेल्या खुरगाव येथील मालेगाव रोडवर श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने शाळा सुरू आहे. पहिली पासून दहावी पर्यंत ही शाळा चालविली जात आहे. अत्यंत भव्य अशा इमारतीत आणि भव्य मैदान असलेल्या परिसरात ही बोगस शाळा थाटलेली आहे. मात्र, ही शाळा पूर्णपणे बेकायदेशीर असून बोगसपणे सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या शाळेला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. याचबरोबर सी.बी.एस.ई. किंवा इतर तत्सम कोणत्याही बोर्डाची मान्यता या श्री चैतन्य टेक्नो स्कूल शाळेला नसल्याचेही समोर आले आहे. एकंदरच कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर आणि बोगसपणे ही शाळा चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
किड्स किंग्डम शाळेऐवजी आता श्री चैतन्य टेक्नो स्कूल
विशेष बाब म्हणजे, नांदेड शहरातील प्रतिष्ठित शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पूर्वीच्या किड्स किंग्डम स्कूलच्या भव्य इमारतीत आता श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने ही शाळा चालवली जात आहे. पहिलीपासून दहावीपर्यंत हजारो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. किड्स किंगडम या नावाने पूर्वी प्रतिष्ठा मिळवलेल्या शाळेने, त्या शाळेच्या जागी आता श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने बेकायदेशीर आणि बोगस शाळा का सुरू करू दिली आहे, यात नेमके काय गौडबंगाल आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हजारो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फीस वसुली
श्री चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून एक लाख रुपयांच्या वर फीज वसुली केली जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात फीज भरूनही या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरीच बनल्याचे दिसून येत आहे.

मनसेकडून कडक कारवाईची मागणी
श्री चैतन्य टेक्नो स्कूलसह किड्स किंग्डम खाजगी संस्थेकडून संगणमत करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. पालकांकडून फीस च्या नावाखाली लाखो रुपयाची आर्थिक लूट करून फसवणूक केली जात असल्याचे मनसेने म्हटले आहे. तसेच फौजदारी गुन्ह्यासह शाळेला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाला भेट देऊन शाळेवर कारवाईची मागणी केली आहे. या बोगस शाळेला कायमस्वरूपी टाळे ठोकून बंद करणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पूर्ण पाठपुरावा करण्यात येईल असा इशारा मनविसेचे राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी, जिल्हाध्यक्ष रवि राठोड, मनविसे संतोष सुनेवाड, मनविसे जिल्हाध्यक्ष शक्ती परमार, मनविसे शहराध्यक्ष शुभम पाटील आदींनी याबाबत शिक्षण विभागाला निवेदन दिले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



