ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर : लातूर शहराला लागून असलेल्या मौ. आर्वी येथील नागरिकांवर आज काळाने घाला घातला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावर बीड जिल्ह्यातील सायगाव शिवाराजवळ क्रुझर जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ०८ जण ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या भीषण घटनेमुळे आर्वी गावावर शोककळा पसरली आहे.
लातूर शहराला लागून असलेल्या आर्वी येथील सोमवंशी कुटुंबातील जवळपास १२ जण बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी इथे उत्तमराव गंगणे यांच्याकडे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी बीड जिल्ह्याच्या लातूर-अंबाजोगाई मार्गावरील सायगाव शिवारातील एका दूध डेअरीजवळ क्रुझर जीप आणि भरधाव वेगातील ट्रकचा भीषण अपघात झाला. ज्यात सोमवंशी कुटुंबातील ०७ जणांचा मृत्यू झाला. ज्यात महिलांचा मोठा समावेश आहे. या अपघात इतका भीषण होता की त्यात क्रुझर जीपचा टप उडून गेला होता. परिणामी अपघातानंतर रस्त्यावर अक्षरश: हाडामांसाचा सडा पडला होता. त्यामुळे अपघाताचे विदारक चित्र दिसून येत होते. या अपघातात एम. एच. २४-व्ही ८०६९ या क्रुझर जीप मध्ये अधिक प्रवासी असल्याची माहितीही पुढे येत आहे. तर भरधाव वेगात येणारा ट्रक क्र. आर. जे. ११- जीए ९२१० याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
मृतांमध्ये निर्मला सोमवंशी, स्वाती बोडके, शकुंतला सोमवंशी, सोजरबाई कदम, चित्रा शिंदे, खंडू रोहिले तसेच इतर दोघांचा समावेश आहे. तर तब्बल ११ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻