ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मतदानाला जाताना केवळ तीन मिनिटांचा फरक पडला, विधानसभा सभापतींना विनंतीही केली होती -अशोक चव्हाण
◆ कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर
नांदेड- राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या राज्य सरकारने ‘स्थगिती सरकार’ बनू नये अशी टीका माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्याचबरोबर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नुकतेच जे काही कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांना नांदेड जिल्ह्यातून मंत्रिपदाची संधी दिली जावी अशी उपहासात्मक मागणी त्यांनी केली.
येथील आयटीएम कॉलेजच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ.अशोक चव्हाण बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देत शेकडो कोटींच्या निधीला नवीन सरकारकडून स्थगिती देण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आ.अशोक चव्हाण यांनी नवीन सरकारने स्थगिती सरकार अशी ख्याती निर्माण करून घेऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. सरकार स्थापनेच्या घडामोडींदरम्यान ना. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष म्हणजे आमचे शत्रू नव्हे, असे स्वागतार्ह विधान केले होते. त्यांनी या गोष्टीचे स्मरण ठेवावे अशी अपेक्षाही आ. चव्हाण यांनी व्यक्त केली. काही जण आम्ही मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती मिळवण्याचा आसुरी आनंद घेत आहेत, त्याऐवजी त्यांनी सर्व विकासकामे पूर्ण करून ती कामं पूर्ण केल्याचा आनंद घ्यावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
नांदेड- जालना समृद्धी महामार्गाला जोडणे, लेंडी प्रकल्प, नांदेड न्यायालयाचे स्थलांतर, विविध शैक्षणिक संकुलांची उभारणी, कार्यालयीन इमारती अशा विविध कामे पूर्ण व्हायला हवीत. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामालाही सरकार स्थगिती देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत असून सरकारने असे करणे दुर्दैवी असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
नवीन सरकारमध्ये नांदेड जिल्ह्यातून कोणाला संधी मिळू शकेल असे वाटते या प्रश्नावर त्यांनी, उपहासात्मक उत्तर देत नांदेड जिल्ह्यातून आ.कल्याणकर यांना मंत्रिपदाची संधी मिळायला हवी अशी प्रतिक्रिया दिली. आ. कल्याणकर यांनी नुकतेच त्यांचे कर्तृत्व सिद्ध केल्याची जोडही त्यांनी यावेळी दिली.
विधानसभेत मतदानाला जाताना उशीर झाल्याबाबत स्पष्टीकरण देताना अशोक चव्हाण म्हणाले की, सभागृहात नेहमी चर्चा होऊन मतदान होते. तसेच आताही होईल असे वाटल्याने आम्ही काहीशा उशिराने म्हणजे अगदी तीन मिनिटांच्या उशिराने पोहोचलो. पण मतदान लगेच सुरू झाल्याने दरवाजे बंद झाल्याने आम्हाला आत जाता आले नाही. आम्हाला आत प्रवेश देण्याबाबत सभापतींनाही आम्ही विनंती कळवली होती, पण प्रवेश मिळाला नाही, असे आ. अशोक चव्हाण म्हणाले.
या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मारोतराव कवळे गुरूजी, माध्यम समन्वयक अभिजित देशमुख, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजिबोद्दीन आदींची उपस्थिती होती.
रामराव महाराज ढोक, डॉ. दीपक म्हैसेकर, शेखर देसरडा, डॉ. विश्वंभर चौधरी, कॅ. स्वाती महाडिक यांना कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर
मराठवाड्यातील प्रतिष्ठेचे कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित झाले असून, यंदाच्या सन्मानार्थींमध्ये रामायणाचार्य, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. रामराव महाराज ढोक, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, सुप्रसिद्ध उद्योजक शेखर चंपालाल देसरडा, पर्यावरणवादी विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी आणि कॅ. स्वाती महाडिक यांचा समावेश आहे.
येत्या १४ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते आदिनाथ कोठारे यावेळी विशेष अतिथी असतील. कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी आज याबाबतची घोषणा केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻