ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील विमानतळ पोलीस ठाणे हे एमजीएम कॉलेज शेजारील जागेत स्थलांतरित होणार आहे. याठिकाणी विमानतळ पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार असून पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी आज या जागेची पाहणी केली.
पूर्वी असलेल्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सन २०११ मध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नव्याने विमानतळ पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. परंतु विमानतळ पोलीस ठाण्याला जागा मिळत नव्हती. त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या इमारतीत हे पोलीस ठाणे कार्यरत झाले. परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर एमजीएम अर्थात महात्मा गांधी मिशन महाविद्यालयाच्यासमोर विमानतळ भिंतीलगत हक्काची जागा मिळणार आहे. त्याची मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात येत असून आज पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी मंगळवारी दिनांक १२ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता या जागेची पाहणी केली.
नांदेड शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी वाढत होती. भाग्यनगर पोलीस ठाण्याची हद्द सर्व ठाण्यापेक्षा मोठी होती. या ठाण्याच्या हद्दीत काही ग्रामीण भाग व शहराचा मोठा भाग येत असल्याने या पोलीस ठाण्यानंर्गत गुन्हेगारीचा मोठा ताण पडत होता. त्यामुळे या ठाण्याचे विभाजन करून नव्याने विमानतळ पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले. परंतु सुरुवातीला या पोलीस ठाण्याला जागा मिळणे अवघड झाले होते. अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेची जागा पोर्णिमानगर, नाईकनगर भागात होती. ती जागा पोलीस विभागाने दरमहा ३४ हजार रुपये भाड्याने घेतली. दि. २१ ऑगस्ट २०११ पासून या इमारतीत विमानतळ पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री डी. पी. सावंत आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर पहिले पोलीस निरीक्षक म्हणून व सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नांदेड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर असलेले धरमसिंग चव्हाण हे होते.
विमानतळ पोलीस ठाण्याला आता हक्काच्या इमारतीसाठी ही जागा मिळाली असून या जागेची पाहणी आज पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, फौजदार एकनाथ देवके यांनी केली. लवकरच महात्मा गांधी मिशन कॉलेजसमोर विमानतळ पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळावी यासाठी सन २०१० पासून कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनीही पाठपुरावा केला होता. त्यांनीही या इमारतीचे काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻