ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नांदेड– येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्रास गुंडागर्दीचे प्रकार होत असून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या तीन दुचाकी चक्क जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुचाकीची चावी का दिली नाही म्हणून सिडको भागात यापूर्वी तीन दुचाकी जाळल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ परिसरात तीन गाड्या जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अज्ञात गुंडांनी हैदोस घालत शुक्रवार दि. २० रोजी मध्यरात्री कर्मचाऱ्यांनी पार्किंगमध्ये लावलेल्या तीन दुचाकी जाळल्या. हा प्रकार शनिवार दि. २१ मे रोजी सकाळी सर्वांच्या लक्षात आला.
येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मोठा परिसर आहे. या परिसरात विविध संकुलासह विद्यापीठातील अधिकारी
व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानाचीही सोय आहे. परंतु पुरेशी सुरक्षा यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्याने या परिसरात चोरी, वाहन चोरी असे प्रकार घडत असतात. गेल्या काही दिवसापासून परिसरात चोरट्यांचा वावर वाढला आहे. परिणामी येथील कर्मचारी वाहने व मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याच्या वाहनाचे टायर अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. यानंतर आता काल शुक्रवार दि. २० रोजी मध्यरात्री विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन दुचाकी वाहनांना अज्ञात माथेफिरूने पेटवून दिले. हा प्रकार आज शनिवार दि. २१ मे रोजी सकाळी उघडकीस आला.
विद्यापीठात अशा गंभीर घटना वारंवार घडत असल्याने विद्यार्थी व कर्मचारी त्रस्त आणि भयभीत झाले आहेत. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यापीठात चोरटे आणि माथेफिरूवर आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻