ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- येथील शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणात गैरव्यवहार लपवण्यासाठी स्वतःच्याच कार्यालयातील संचिका गायब केल्यावरून त्यांच्याविरुद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे यांनी अर्धापूर येथील एका संस्थेला नियमबाह्य नैसर्गिक वर्ग वाढ करण्याची मान्यता दिली. एवढेच नाहीतर ती फाईलच गहाळ करीत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार लातूरच्या उपविभागीय कार्यालयाला समजताच त्यांनी पुणे येथील मुख्य कार्यालयाला तशी माहिती कळविली, त्या कार्यालयाच्या आदेशावरून अखेर वजिराबाद पोलीस ठाण्यात डॉ. सविता बिरगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे सविता बिरगे यांना काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये त्याच पदावर असताना चार लाख रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले होते.
नांदेडच्या प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्याच विभागात अनागोंदी कारभाराचे दर्शन पहावयास मिळत आहे. माळेगावच्या यात्रेनंतर पशुसंवर्धन विभाग, त्यानंतर जलजीवन मिशन आणि आता तर चक्क शिक्षण विभागाच चर्चेत आला आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे यांनी 28 डिसेंबर 2016 ते आजपर्यंत आपल्या कार्यकाळात विविध गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर येथील श्री साई शिक्षण संस्था लोणी बुद्रुक तालुका अर्धापूर संचलित आदर्श प्राथमिक विद्यालय अर्धापूर या शाळेत मराठी माध्यमासाठी पाचवी ते सातवी वर्गाला नैसर्गिक वर्ग वाढ करण्यात मान्यता आदेश निर्गमित करताना शिक्षण अधिकारी प्राथमिक बिरगे यांच्या कार्यालयाने सत्यासत्त्येतेबाबत कोणतीही खातरजमा केली नाही. यावरून हे आदेश त्यांच्या कार्यालयाकडून कार्यान्वित करण्यात आलेले असून त्यानंतरही संचिका गहाळ झाली आहे. वरील परिस्थिती पाहता सदरील आदेशाचा गैरफायदा संबंधित संस्थेला व्हावा या हेतूने डॉ. सविता बिरगे यांनी सदरचे आदेश निर्गमित करून शासनाची फसवणूक केली हे तपासणीत निष्पन्न झाले.
या प्रकरणाची चौकशी मागील अनेक वर्षापासून सुरू होती. लातूरच्या शिक्षण उपविभागीय कार्यालयाला पुणे येथील आयुक्त सुरज मांढरे यांनी पत्रव्यवहार करून या संबंधात कारवाईचे आदेश दिले होते. अखेर यावरून अधीक्षक, शिक्षण संचालनालय पुणे दीपक अर्जुन पाटील यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार करत आहेत. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांनी लक्ष घातले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻