ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या भाजपच्या पहिल्या महापौरपदी कविता मुळे यांची निवड निश्चित झाली आहे. तर उपमहापौर पदी दीपकसिंह रावत यांची निवड होणार आहे.
नांदेडमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत यात भाजपाकडून महापौर पदासाठी कविता मुळे यांचा तर उपमहापौर पदासाठी दीपक सिंह रावत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे नांदेडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले असल्याने या दोघांच्या निवडीची आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

महापौर पदी निवड निश्चित झालेल्या कविता मुळे या प्रभाग क्रमांक दोन तरोडा (बु.) भागातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेल्या आहेत. तर उपमहापौरपदी निवड निश्चित झालेले दीपकसिंह रावत हे प्रभाग क्रमांक 16 वजीराबाद/गाडीपुरा या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत.
येथील महापालिका महापौर पदाची निवड प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर गुरुवार दि. ५ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. या उमेदवारांचे अर्ज आज शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी स्वीकारले. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी विशेष सभेत महापौर/ उपमहापौर निवडले जाणार आहेत. यावेळी सर्वसाधारण महिला प्रवगार्साठी हे पद राखीव आहे. कविता मुळे महापौरपदी तर दिपकसिंह रावत उपमहापौरपदी यांच्या नावाची घोषणा औपचारिकरित्या १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपने स्वबळावर ४५ जागांवर विजय मिळविला तर शिवसेना शिंदे गटानेही पाठिंबा देत ४ सदस्य भाजपासोबत जोडले आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना महायुतीची सदस्य संख्या आता ४९ वर पोहोचली आहे. दुसरीकडे महापालिकेत एमआयएमने १४ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. काँग्रेसला १०, वंचित बहुजन आघाडीला ५, राष्ट्रवादी (अजित पवार गट) दोन आणि एका अपक्ष उमेदवारालाही संधी मिळाली आहे.
महापौर निवडण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर दि. ५ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज विकत घेतले आहेत. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील कै. शंकरराव चव्हाण सभागृहात दि. १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विशेष सर्वसाधारण सभेत महापौर पदाची निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात ही विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. महापौर पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात येणार आहे. यानंतर गुरूवारी नगरसेवकांची बैठक घेत महापौर निवडीबाबत नगरसेवक प्रतिनिधींची महापौर पदाबाबतची मते जाणून घेण्यात आली. दरम्यान भाजपने प्रदेश कोअर कमिटीचे नाव पुढे केले असले तरी खा. अशोकराव चव्हाण जे नाव अंतिम करतील तोच महापौर होईल हे मात्र निश्चित मानले जात होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये कोअर कमिटीसाठी चार नावे देण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये कविता मुळे, शांभवी साले, सुदर्शना खोमणे, ज्योती कल्याणकर, वैशाली देशमुख यांच्या नावांची चर्चा होती. अखेर कविता मुळे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली आहे.
भाजपचे गटनेते महेश कनकदंडे यांनी महापौर आणि आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी आठ अर्ज विकत घेतले. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने एकूण ६ अर्ज तर एमआयएमने ४ अर्ज विकत घेतले होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



