ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– नांदेडमध्ये पुन्हा दोन पिस्तुलांसह घातक हत्यारं पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याचबरोबर ५ दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
शहरापासू₹न जवळच असलेल्या हस्सापुर शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, चार जिवंत काडतुस व अन्य घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई एलसीबीने हस्सापुर शिवारामध्ये दिनांक 17 मेच्या रात्री केली.
नांदेड शहर व परिसरात पिस्तुल, तलवार, खंजर यासह अन्य घातक शस्त्र घेऊन फिरणारे गुन्हेगार दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून पाच पिस्तूल जप्त केली होती. तसेच सोनखेड, मुदखेड, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळे पथकं वेगवेगळ्या दिशेने गस्त घालत होती.
याच गस्ती दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस फौजदार दत्तात्रय काळे, सहायक फौजदार गोविंद मुंडे, जसवंतसिंह साहू यांना हस्सापुर शिवारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना पकडण्याच्या सुचना देण्यात आल्या. यावरून पांडुरंग भारती यांनी अतिशय गुप्तपणे या परिसरात सापळा लावून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
यावेळी आरोपींकडे पिस्तुलं असल्याने त्यांना पकडण्यासाठी फार पोलिसांना मोठी जोखीम पत्करावी लागली. पकडलेल्यामध्ये कमलेश उर्फ आशु बालाजी लिंबापुरे (वय 22) राहणार वसरणी नांदेड, श्याम मुंजाजी सोनटक्के (वय २२) जुना कौठा नांदेड, शिवाजी उर्फ शिवा माधवराव थेटे ( वय २३) राहणार टाकळगाव, तालुका लोहा, काळेश्वर रावण जाधव ( वय २५) रा. असर्जन आणि दीपक ऊर्फ वाघु भुजंग बुचाडे (वय 23) राहणार आवई तालुका पूर्णा यांचा समावेश आहे.
या टोळीकडून दोन पिस्तुलं, पाच मोबाईल, चार जिवंत काडतुस, दोरी, मिरचीपूड व अन्य घातक शस्त्र असा जवळपास 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दत्तात्रय काळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) डॉ. अश्विनी जगताप यांनी द्वारकादास चिखलीकर आणि एलसीबीच्या पथकाचे कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻