Thursday, November 21, 2024

नांदेडला मिळणार आणखी दोन खासदार: भाजपने अशोक चव्हाण यांच्यासह डॉ. गोपछडे यांनाही दिली राज्यसभेची उमेदवारी!

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• नांदेडला एकूण चार खासदार

मुंबई/ नांदेड – भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठीच्या आपल्या उमेदवारांची नावे आज जाहीर केली आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांनाही भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी मिळालेली असल्याने नांदेडला आणखी दोन खासदार मिळणार आहेत.

कालच भाजपात प्रवेश केलेले अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्या अंदाजाप्रमाणे त्यांचे नाव राज्यसभेसाठी भाजपकडून जाहीर झाले, पण त्याचबरोबर अनपेक्षितपणे नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांचेही नाव आजच्या यादीत जाहीर झाले असून नांदेडकरांना हा सुखद धक्का भाजपने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.

नांदेडला चार खासदार
नांदेडमध्ये यापूर्वीच दोन खासदार आहेत. यात नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि नांदेडचेच हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेचे शिवसेना खासदार आहेत. त्यानंतर आता अशोकराव चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या रूपाने नांदेडला आणखी दोन खासदार मिळणार असून एकट्या नांदेडमध्ये खासदारांची एकूण संख्या चार होणार आहे.

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे
काँग्रेसकडूनही राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  यात महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास तशी अडचण येणार नाही. तर भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत. त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित येऊ शकतो. तर ठाकरे गट आणि शरद पवार गट मिळून एक उमेदवार देण्याची शक्यता आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील महाराष्ट्रातील कुमार केतकर (काँग्रेस), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार), अनिल देसाई (ठाकरे गट), प्रकाश जावडेकर (भाजप), नारायण राणे (भाजप), व्ही. मुरलीधरन (भाजपा) यांच्या 6 जागांचाही समावेश आहे. दरम्यान, देशभरात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, हरियाणा, हिमाचल, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यसभेच्या निवडणुका आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!