ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – येथील उत्तर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे. यातच महाविकास आघाडीचेही या मतदारसंघात दोन उमेदवार असणार आहेत. त्याचप्रमाणे याच मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी झालेली आहे.
नांदेड उत्तर मतदार संघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढाई होणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून संगीता पाटील डक या उमेदवार असणार आहेत. यातच महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख घटक पक्षांचे या मतदारसंघात उमेदवार असणार आहेत. सुरुवातीला महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार यांची या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडूनही संगीता पाटील डक यांना एबी फॉर्म देत अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांचे दोन उमेदवार असणार आहेत.
भाजपची बंडखोरी
सत्ताधारी महायुतीमध्ये नांदेड उत्तरची ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आता भाजपची याठिकाणी बंडखोरी झाली असून भाजपचे मिलिंद देशमुख यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने प्रशांत इंगोले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एकूणच नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भाजप बंडखोर, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी अशी काहीशी बहुरंगी लढत होणार आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच विधानसभा मतदारसंघातील चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻