ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे २६ मार्च रोजी सभा होणार आहे. एकीकडे या सभेची जय्यत तयारी सुरू असतानाच दुसरीकडे नांदेडसह मराठवाड्यातील विविध पक्षांचे अनेक नेते बीआरएस पक्षात प्रवेश करीत आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, प्रा. यशपाल भिंगे आदी अनेक नेत्यांचा समावेश आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर चांगलेच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड शहरात सभा झाल्यानंतर २६ मार्च रोजी पुन्हा एक सभा ते नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे घेणार आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह अनेक नेते बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
माजी आमदार धोंडगे यांच्यासह इतरही अनेक नेते यानिमित्ताने बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. यात आता पुन्हा प्रामुख्याने भाजप नेते, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे जावई तथा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. यशपाल भिंगे, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असणारे डॉ. दत्ता मोरे आदींचा समावेश आहे. या सर्वांनी काल बुधवारीच हैद्राबादमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते बीआरएस पक्षात प्रवेश केला. हे सर्व नेते दि. २६ मार्च रोजी लोहा येथील जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यात बीआरएस मध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत ज्यांची नावे पाठवली होती, त्यात प्रा. यशपाल भिंगे यांचे होते. त्यांनीही काल बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या ३ ते ४ दिवसांतही विविध पक्षातील अनेक नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागनाथ घिसेवाड यांचा समावेश आहे. एकूणच आधी सीमावर्ती भागातील नेत्यांना पक्षात घेण्यापासून बीआरएस ने सुरू केलेला आपला विस्तार आता वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻