ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले
नांदेड– जिल्ह्यात व परिसरात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील देगलूर, भोकर, लोहा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेले सुमारे ३४ प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाली आहे. सर्व संबंधितांना पूर परिस्थितीबाबत दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
१०० टक्के भरलेल्या ३४ प्रकल्पांमध्ये देगलूर तालुक्यातील भूतनी हिप्परगा ल.पा. येडूर साठवण तलाव, हानेगाव एक व हानेगाव दोन ल.पा. अंबुलगा ल.पा., मुखेड तालुक्यातील शिरुळ ल.पा. मुखेड ल.पा. सोनपेठवाडी ल.पा. कुंदराळा मध्यम प्रकल्प, बिलोली तालुक्यात दर्यापूर ल.पा., लोहा तालुक्यात सुनेगाव, भोकर तालुक्यात लामकानी ल.पा., धानोरा ल.पा., सावरगाव ल.पा., कोंडदेव ल.पा.,उमरी तालुक्यातील कुदळा मध्यम प्रकल्प, कारला, गोरठा, सोमठाना ल.पा., हदगाव तालुक्यातील चाभरा ल.पा., पिंपराळा, केदारनाथ, घोगरी, येवली, चिकाळा, धनिकवाडी, लोहामांडवा ल.पा. समावेश आहे. हिमायतनगर तालुक्यात सुना, पवना ल.पा.,कंधार तालुक्यात पानशेवडी ल.पा., घागरदरा, भेंडीवाडी सा. त. पेठवडज मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.
माहूर- जिल्ह्यातील माहूर जवळच्या धनोडा येथील पैनगंगा नदीला पुर आल्याने रस्ता बंद झाला असून वाहतूक थांबल्याने विदर्भ- मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. दरम्यान या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा श्री रेणुका देवी संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव यांनी माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर भाविकांना दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
माहूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. बुधवार दि. 13 जूलै रोजी सकाळपर्यंत तालुक्यात 86.46 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी नदीकाठच्या गावात व शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले. पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली आहे. तहसीलदार किशोर यादव, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी पाहणी केली असून पुर परिस्थितीमध्ये या भागात पोलिसांची गस्त सुरू केली आहे. नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान तहसीलदार किशोर यादव यांनी नांदेडसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याचे कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे असे आवाहन करत माहूर गडावरील रेणुका देवी मंदिर पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻