ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे. पालकमंत्री व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनेक ठिकाणी कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळे होत आहेत. मात्र, काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकेला महावितरणचे 51 कोटी रुपये बिल भरणा होत नसल्याने मागील आठ दिवसांपासून शहरवासीय अंधारात चाचपडत आहेत.
शहरामध्ये पवित्र सचखंड गुरुद्वारा आणि विविध महत्वाची पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांना जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेची एकहाती सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे. महापालिका कोट्यावधी रुपयांच्या कर्जाच्या खाईत अडकल्याने महापालिकेचे आर्थिक गणित बिघडत चालले असल्याचे सांगितले जाते. यातून कसेबसे बाहेर निघण्याचा प्रयत्न महापालिका वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्यात गुंठेवारी, मालमत्ता कर, नळपट्टी यातून नांदेडकरांनी थकबाकी भरण्याचे आवाहन करत आहे. महापालिका अशा काही आर्थिक अडचणीत आली की, सक्तीची कर वसुली केली जाते. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आणि इतरही सर्वजण अडचणीत आलेले आहेत, त्यामुळे सध्यातरी त्यांना सक्ती न करता इतर आर्थिक स्रोतांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे महानगरपालिकेला होणारा महावितरणचा वीज पुरवठा ज्यात पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती यासाठी मोठा कर त्यांना द्यावा लागतो. यातच दिवाबत्ती (स्ट्रीट लाईट) मागील काही दिवसांपासून थकबाकीचा डोंगर वाढत गेला आणि आज घडीला महापालिकेवर तब्बल 51 कोटी रुपयांचा विज बिल थकले आहे. अनेक पत्र व्यवहार केल्यानंतर महापालिकेने महावितरणला प्रतिसाद दिला नसल्याने अखेर महावितरणने नांदेड शहरातील दिवाबत्ती (स्ट्रीट लाईट) पुरवठा खंडित केला. आठ दिवसांपासून शहर अंधारात चाचपडत आहे. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी व्यक्त केली आहे. भाजपाच्या शिष्टमंडळासह इतरही काही संघटनांनी याबाबत आंदोलनाचा इशारा देणारे निवेदनही मनपा आयुक्तांना दिले आहे.
महापालिकेने काही प्रमाणात जर महावितरणच्या वीज पुरवठ्याचा वीज बिल भरणा केला तर वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महावितरणकडून वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी नांदेडकरांमधून होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻