ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली
नांदेड– जिल्ह्याला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली असून गहू, केळी, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर जवळील पोलीस चौकीचे पत्रे उडून गेल्यानंतर आलेल्या गारांच्या पावसामुळे चौकीत गारांचा खच साचला होता. या भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली.
जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवार दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा झाले. जिल्ह्यात सर्वत्र वादळीवाऱ्यासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. शेतात काढणीला आलेला गहू, हरभरा, केळी यासह अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे.
विशेष म्हणजे बारड येथील महामार्ग पोलिसांच्या कार्यालयावरील टीन पत्र उडाल्याने कर्मचाऱ्यांनी आपला जीव मुठीत घेऊन भिंतीचा आसरा घेतला. कार्यालयात गारांचा खच पडला होता. यासह मुदखेड तालुक्यातील पाथरड, मुगट, बारड यासोबतच नांदेड तालुक्यातील भायेगाव, काकांडी, धनेगाव, वांगी, वाजेगाव आदी भागात तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. नांदेड शहराच्या चोहूबाजूने पावसाने आपले आक्रमक रूप दाखवले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला गहू, हरभरा व बागायती पिके पावसाने हिरावून नेले. शेतातील अनेक आखाड्यावरील पत्रे उडाली, झाडे कोलमडली तर काही ठिकाणी महावितरणच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला. नांदेड शहराच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.
मुदखेड परिसरात सर्वाधिक बागायती पिकांना, फुल शेतीला मोठा फटका बसला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या यंत्रणेला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यव्यापी संपामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी व नुकसानीचा स्थळ पंचनामा करण्यासाठी एकही कर्मचारी कर्तव्यावर नसल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पावसामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना आपल्या मागण्यासाठी शुक्रवारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याने पंचनामे कोण आणि कधी करणार असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे आहे.
अनेक जनावरं मृत्युमुखी
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धनज ( बु ) येथे दुपारी वीज पडून शेतकरी माधव काळबा शिंदे यांचा एक बैल ठार झाला असल्याची माहिती तहसीलदार लोहा यांनी दिलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दिनांक 16 मार्च रोजी वीज पडून खालील घटनांची नोंद झाली आहे.
1) तलाठी सज्जा होंडाळा अंतर्गत दुपारी 3 वाजता लादगा येथील शेतकरी अंतेश्र्वर केशव जाधव यांची शेळी ठार झाली.
2) तलाठी सज्जा बार्हाळी अंतर्गत बार्हाळी येथील शेतकरी कांशीराम संभा अस्वले यांची म्हैस दुपारी 4.40 वा वीज पडून ठार झाली आहे.
3) तलाठी सज्जा ईटग्याळ ( पमु) अंतर्गत मारजवाडी येथे अंदाजे पाच वाजता शेतकरी व्यंकट मारोती कोंडेवाड याच्या शेतात गट क्रमांक 40/अ मध्ये वीज पडून बैल ठार झाला आहे.
लोहामधील कोडगाव येथे दुपारी चारच्या सुमारास गोविंद अर्जुन दर्शने (वय ६०) व शिवाजी रामा भरकडे (वय 38) या दोन व्यक्ती वीज पडून जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻