ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ महासत्संगास हजारों भाविकांची गर्दी
नांदेड– काल बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी श्री श्री रविशंकरजी हे नांदेडमध्ये होते. त्यांच्या महासत्संगास हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. या दौऱ्यात श्री श्री रविशंकरजी यांनी अनोखा राजकीय समतोल साधल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी नांदेडमध्ये आयोजित महासत्संगाच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगरस्थित निवासस्थानी भेट देतानाच भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंत नगरस्थित निवासस्थानीही भेट दिली.
महा सत्संगाच्या कार्यक्रमास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची चर्चा होत असतानाच श्री श्री रविशंकरजी यांनी साधलेल्या या राजकीय समतोलाची नांदेडमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.
‘आर्ट ऑफ लिविंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या भव्य महासत्संगाचे काल बुधवारी नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले होते. या महासत्संगाच्या आयोजनाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे होती, तेच या महासत्संगाच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. काँग्रेसने अंगीकारलेल्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेवरील हे त्यांचे एक प्रकारे मार्गक्रमणच होते. नेमकी हीच बाब हेरून भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हेही महासत्संगाच्या आदल्या दिवशी अचानकपणे ‘ॲक्शन मोड’वर आल्याचे पहावयास मिळाले. आणि म्हणूनच की काय, खासदार चिखलीकर यांनी भराभर सूत्र हलवून श्री श्री रविशंकरजी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट देण्याचा कार्यक्रम घडवून आणला. त्यानुसार नांदेडमध्ये आगमन होताच श्री श्री रविशंकरजी हे थेट खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या निवासस्थानी पोहोचले.
खासदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी
श्री श्री रविशंकरजी यांचे दुपारी खासदार चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साई सुभाष येथे त्यांनी भेट दिली. चिखलीकर यांनी निवासस्थानी आपल्या कुटुंबीयांसह त्यांची पाद्यपूजा केली. यावेळी खासदार चिखलीकर यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभाताई चिखलीकर, कन्या प्रणिता देवरे चिखलीकर, जावई अतिरिक्त जिल्हाधिकारी पंकज देवरे, प्रवीण चिखलीकर, वैशाली चिखलीकर, डॉ. प्रमोद चिखलीकर, डॉ. माया चिखलीकर, ॲड. संदीप चिखलीकर, सोनाली चिखलीकर, सुजाता चिखलीकर य चिखलीकर कुटुंबातील सदस्यांनी श्री. श्री. रवीशंकरजी यांची पाद्यपूजा केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट
त्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी सायंकाळी माजी मुख्यमंत्री तथा महासत्संग कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानीही भेट दिली. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम येथील निवासस्थानी श्री श्री रवीशंकरजी यांनी भेट दिली. यावेळी अशोकराव चव्हाण आणि माजी आमदार अमिता चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी सभापती किशोर स्वामी, नरेंद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
राजकीय समतोल
अशोकराव चव्हाण आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेडच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बनलेले आहेत. अशा या राजकीय स्थितीत श्री श्री रविशंकरजी यांनी आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत, या दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साधलेला राजकीय समतोल येथे चर्चेचा विषय बनलेला आहे.
महासत्संगास अलोट गर्दी
नांदेड शहराच्या जुना कौठा परिसरातील 22 एकर मैदानावर श्री श्री रविशंकरजी यांच्या महासत्संग गुरुवाणी हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिविंगच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नांदेड शहर व जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील हजरों भाविक, साधक यांनी उपस्थिती लावली होती. सायंकाळी सात वाजून वीस मिनिटाला श्री श्री रविशंकरजी महाराज यांचे गुरुवाणी पिठावर आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या सर्व साधकांना खास अशा बनवण्यात आलेल्या रॅम्पवर चालत शुभेच्छा व आशीर्वाद दिला. यावेळी त्यांनी भाविकांवर गुलाब पुष्प उधळले. भाविकांनीही हात उंचावून त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री श्री रविशंकरजी यांनी आपल्या गुरुवाणीला सुरुवात करत, कसे आहात? झकास का? अशी मराठीतून सुरुवात केली. सर्व प्रसन्न आणि खुश रहा, सत्संगाला आलेल्यांनी आता चिंता येथेच सोडून आत्मचिंतन करून परत जा, असा सल्ला दिला. कौठा भागातील मामा चौक येथील मैदानावर श्री रवीशंकरजी यांच्या या गुरुवाणी महासत्संग सोहळ्यास अलोट गर्दी झाली होती.
तत्पूर्वी बुधवारी दुपारी ते कोल्हापूर येथून नांदेड येथे विमानतळावर आले. यावेळी त्यांचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी मंत्री डी. पी. सावंत, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, मिलिंद देशमुख, किशोर स्वामी आदींनी स्वागत केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻