ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– पाकिस्तानमधून गुजरातमार्गे आलेले धुळीचे वादळ रविवारी (दि. २३) मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात धडकले. परिणामी सकाळपासूनच कमाल व किमान तापमानात चांगलीच घट झाली. पुढील दोन-तीन दिवस त्यात आणखी घट होईल. धुळीमुळे श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो, अशी माहिती एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
गुजरात, अरबी समुद्रमार्गे हे धुळीचे वादळ राज्यात दाखल झाले असून, मुंबई, पुणे, धुळे, जळगाव, अमळनेर आदी
जिल्ह्यांमध्ये त्याची तीव्रता जास्त प्रमाणात जाणवत आहे. वादळामुळे धूळ वातावरणात पसरल्याने, दृश्यमानता कमी झाली असून, सर्वत्र धुके पसरल्याचे जाणवत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता कमाल तापमान २२.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. धुळीचे हे वादळ नांदेड तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दाखल होईल. त्यानंतर कमाल व किमान तापमानात आणखी घट होईल. पुढील दोन-तीन दिवस याचा परिणाम जाणवेल, असे औंधकर यांनी सांगितले.
चंद्र नव्हे सूर्यच
दररोज सायंकाळी पश्चिमेला मावळणारा सूर्य नेहमी तांबड्या, केशरी रंगात दिसतो. रविवारी मात्र सूर्य पूर्णपणे पांढरा दिसत होता. सूर्य आहे की चंद्र असा प्रश्न सूर्यास्त पाहून नागरिकांना पडला. धुळीच्या वादळामुळे पांढरा सूर्यही पहायला मिळाला.
या रुग्णांना वाढला त्रास
धुळीच्या वादळामुळे पुढील दोन-चार दिवस श्वास घेण्यास त्रास होणार आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना त्रास आणखी वाढेल. त्याचबरोबर कमाल व किमान तापमान घटल्याने, थंडीचा कडाकाही वाढला असून, सर्दी-पडसे, खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻