ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार हाच पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचे उगमस्थान ठरले आहे. नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पावडेच्या लोकप्रतिनिधीचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी भेटले. त्यांनी नगरपंचायतच्या निर्मितीस हिरवी झेंडी दाखवली असल्याची माहिती खासदार चिखलीकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार हाच पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचे उगमस्थान ठरले आहे. सोमवार दि. 18 जुलै 2023 रोजी नांदेडचे लोकप्रिय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पावडेवाडी ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी नांदेड उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख मिलिंद देशमुख, संभाजीराव पावडे, बंडू पावडे, प्रतापराव पावडे, बापुराव उर्फ बंडू पावडे, हरीभाऊ पावडे, जिल्हा भाजपा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे आदि पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या विधान भवनातील दालनात भेट घेतली.
पावडेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीवाढ झाली आहे. ग्रामपंचायतचे कार्यक्षेत्र नांदेड शहराचे मध्यवर्ती ठिकाण व्यापले आहे. नागरीकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतची यंत्रणा तोकडी पडत आहे, त्यामुळे नागरिकांना रस्ते,पाणी, मलनिःसारण, लाईट यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पावडेवाडी ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावडेवाडी शिष्टमंडळाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन नगरपंचायतच्या निर्मितीस हिरवी झेंडी दाखवली. खा. चिखलीकराना तुम्ही मुंबईत थांबा तुम्हाला सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घडवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीस तत्वतः मान्यता दिल्यामुळे पावडेवाडीच्या निर्मितीस प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यावेळी पालकमंत्री असलेल्या अशोकराव चव्हाण यांनी नांदेड वाघाळा महानगर पालिकेत पावडेवाडी ग्रामपंचायतचे विलीनीकरण करण्याचा राजकीय डाव रचला होता, महापालिकेत विलीन होण्यास पावडेवाडीच्या जनतेने प्रखर विरोध दर्शवून आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे महापालिका हद्द वाढीचा प्रस्ताव बारगळला, असा आरोप भाजपच्यावतीने करण्यात येतो.
आता सरकारपुढे पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचा प्रस्ताव खा. चिखलीकर यांनी सादर करताच त्यास मुख्यमंत्री -उपमुख्यमत्र्यांनी तत्वतः मान्यता दिल्यामुळे नगरपंचायतच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा खा. चिखलीकर यांनी केला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻