ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ नितीन गडकरींप्रमाणे केंद्र सरकारमधील सर्वांनी विकासकामात सहकार्याची भूमिका ठेवायला हवी- शरद पवार
◆ शेतीवरचा भार कमी करण्यासाठी उद्योगाकडेही वळणे आवश्यक
नांदेड- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांची स्तुती करीत खा. शरद पवार यांनी आज नांदेडमध्ये नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्र सरकारला शाब्दिक चिमटे काढले. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या ‘गोदावरी अर्बन’च्या ‘सहकार सूर्य’ मुख्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात खा. शरद पवार बोलत होते. नितीन गडकरी यांच्याप्रमाणे केंद्र सरकारमधील सर्वांनी विकासकामात सहकार्याची भूमिका ठेवली तर अपेक्षित विकास साधता येईल अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे बोलताना व्यक्त केली.
नांदेड येथील खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांच्या “सहकारसूर्य” या गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालय उद्घाटनाप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आरबीआय बँकेचे संचालक सतिष मराठे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार अनसूया खेडकर, माजी आमदार पाशा पटेल यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
नितीन गडकरी यांची स्तुती करताना शरद पवार म्हणाले की, राजकीयदृष्ट्या त्यांची आणि आमची भूमिका वेगळी असली तरी विकासाच्या दृष्टिकोनातून एक सक्षमपणे।पुढाकार घेत असतात. जिथे विकासकामांचा प्रश्न येतो तिथे त्यांची भूमिका नेहमी सहकार्याची आणि सामंजस्याची असते. हाच दृष्टिकोन जर देशाच्या पातळीवर केंद्र सरकारमधील नेतृत्वाने आणि इतर सर्वांनी ठेवला तर देशाचा चेहरा बदलण्याची सर्वांची जी अपेक्षा आहे, ती आपण पूर्ण करू शकू अशी अपेक्षा खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात गोदावरी अर्बनने एक नावलौकीक केला. नांदेड हे गोदावरी आणि गुरु गोविंदसिंग यांची पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जात होती. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात एमजीएमने नांदेडचे नावलौकिक कमावले आणि आता गोदावरी अर्बनने चमत्कार करून दाखवला. नांदेडची ओळख परराज्यात नेली. शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात येणे जरुरी आहे. देशातील 60 टक्के जमिनी ह्या कोरडवाहू जमिनी आहेत. निसर्गाच्या लहरीवर शेती असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीवर भार न टाकता उद्योगाकडे वळावे. यासाठी आर्थिक भाग भांडवल देण्यासाठी गोदावरी अर्बन सारख्या संस्था उभ्या आहेत. परंतु घेतलेले कर्ज त्याचा योग्य वापर करून त्या कर्जाची परतफेड वेळेत करा असे आवाहनही पवार यांनी केले. देशातील सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकार क्षेत्र अतिशय महत्त्वाचे काम करत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम सहकार क्षेत्र खऱ्या अर्थाने बँकांचा व अन्य संस्थांच्या माध्यमातून करत आहे, असे ते म्हणाले.
समाजातील हजारो सामान्य लोकांना त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी गोदावरी अर्बन पण संस्था एक चांगले काम करत आहे. दहा वर्षांमध्ये या संस्थेने खऱ्या अर्थाने नावलौकिक करत सर्वसामान्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे धाडस करून दाखवले आहे. या सोबतच शेतीला जोड उद्योग म्हणून तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे असे मतही खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी धनंजय मुंडे यांनी मराठवाड्याच्या गोदावरी अर्बनने केलेला विक्रम खरोखर एक अन्य संस्थानसमोर आदर्श ठरणार आहे. सर्वात प्रथम बँकेची ठेव आणि ग्राहक बनविणे यापेक्षा या लोकांचा विश्वास कमावला अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. चार राज्यात गुजरात सारख्या राज्यातही लोकांनी विश्वास ठेवला. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात या बँकेने घेतलेली भरारी खरेच कौतुकास्पद आहे. या भागातील माय माऊली यांचे सबलीकरण केले. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अर्थपूर्ण करून विविध क्षेत्रात आज महिला ताठ मानेने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, असे ना. मुंडे म्हणाले.
ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात उपस्थिती लावत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. राज्यात विविध क्षेत्रात शेती संदर्भात उद्योग निर्माण झाले पाहिजेत. आता सध्या दळणवळणाच्या माध्यमातून रस्ते जोडणी सुरू असून येणाऱ्या काळात नांदेड सारख्या शहरात ड्रायपोर्ट सुरू करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री पाटील यांनी केले. यावेळी सतीश मराठे, काकासाहेब भोईटे यांनीही मार्गदर्शन केले. बँकेचे सरव्यवस्थापक धनंजय तांबेकर यांनी आभार व्यक्त केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻