ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ वाळूचे टिप्पर चालविण्यासाठी घेतली दीड लाख रुपयांची लाच
नांदेड/ लातूर- अवैध वाळूचे ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या निलंगा (जिल्हा लातूर) येथील तहसीलदार गणेश जाधव आणि त्याच्या एका खासगी व्यक्तीला लातुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.
निलंगा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील तहसीलदार यांच्या हद्दीतून वाळू वाहतूकीच्या गाड्या चालू देण्यासाठी एका तक्रारदाराकडून प्रति ट्रक तीस हजार रुपये मागणी होत असल्याने वाळू व्यापारी त्रस्त झाले होते. अशाच एका वाळू व्यापाऱ्यास त्यांनी तीन ट्रकचे एक लाख 80 हजार रुपये मागितले. तर तडजोड अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले.
परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लातूर येथील एसीबी कार्यालयात दि. २५ मे रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने २६, २८, ३० आणि ३१ मे रोजी पडताळणी सापळा लावला. त्यात दीड लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले आणि अखेर आज शनिवार दिनांक चार जून रोजी तहसीलदाराच्या निलंगा येथील शासकीय निवासस्थानासमोर यांचा खाजगी इसम रमेश गुंडेराव मोरगे राहणार शेंदा तालुका निलंगा याने दीड लाख रुपये तहसीलदार गणेश जाधव यांच्या सांगण्यावरून स्वीकारले. यावेळी पथकप्रमुख अन्वर मुजावर यांनी रमेश मोरगे आणि तहसीलदार गणेश जाधव यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, लातूरचे पोलीस उपाधिक्षक पंडित रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻