ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी सुरू झाल्याने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन एक दबाव गट तयार केला आहे. त्यामुळे अनेक आमदारांचे फोन नॉट रिचेबल असून नांदेड (उत्तर) चे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचाही फोन बंद येत असल्याने त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान भाग्यनगर पोलिसांनी त्या ठिकाणी एका पोलीस वाहनासह अनेक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना सोबत घेऊन रातोरात गुजरातमधील सुरत शहर गाठले आहे. काल रात्रीपासून मराठवाड्यातील काही आमदारांचे फोन स्विच ऑफ असल्याने शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचाही फोन स्विच ऑफ असल्याने व त्यांच्या पीएचेही फोन बंद येत असल्याने नांदेडमध्ये चर्चेला उधाण आले आहे. नांदेडमध्ये शिवसेनेत सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मालेगाव रोडवर असलेल्या संपर्क कार्यालयात मंगळवारी दिवसभर सन्नाटा दिसून आला. सायंकाळी पाचच्या सुमारास भाग्यनगर पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻