ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- सुशिक्षित बेरोजगारांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी हदगाव तालुक्यातही सक्रिय झाली असून या टोळीतील एकाने साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव येथील पैनगंगा वसाहतमध्ये राहणारे सेवानिवृत्त चालक पांडुरंग जयराम परसोडे (वय 65) यांच्या दोन्ही मुलांना शासकीय नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन तामसा येथील शेख मसरत शेख मतलब याने त्यांचा विश्वास संपादन केला. आमच्या वेगवेगळ्या विभागातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत चांगल्या ओळखी आहेत. यापूर्वीही आम्ही अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. तुमच्याही मुलांना नोकरी लावून देतो, असे म्हणून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये उकळण्यात आले. 22 फेब्रुवारी 2015 ते 25 मे दोन 2021 दरम्यान त्यांचा व्यवहार सुरू होता.
पैसे दिल्यानंतरही एकाही मुलाला नोकरी लागत नसल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. परंतु पैसे घेणारा शेख मसरत शेख मतलब रा. संभाजीनगर, तामसा, तालुका हदगाव याने पैसे देण्यास नकार दिला. यावरून सेवानिवृत्त चालक पांडुरंग परसोडे यांनी हदगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख मसरतविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻