ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील सचखंड गुरुद्वारास पंजाब येथे एका वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या भक्ताने तब्बल चार कोटी रुपयाचे हिरेजडित दागिने अर्पण केले आहेत. या भक्ताचे गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्रसिंग बुंगई यांनी स्वागत केले.
पंजाबमधील एका भाविकाने नांदेडमधील गुरुद्वाऱ्याला तब्बल चार कोटी रुपये किंमतीचे दागिने भेट दिले. पंजाबमधील कर्तारपूर येथील गुरुवींदरसिंग सामरा असे या भाविकाचे नाव आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या गुरवींदरसिंग यांनी मागील वर्षीच नांदेडमधील गुरुद्वाऱ्यास सोन्याचे दागिने भेट दिले होते. येथील गुरुगोविंदसिंगजी यांच्याप्रती त्यांनी अडीच किलो सोन्याचे दागिने अर्पण करायचे ठरवले होते. त्यानुसार ते मागील वर्षी दागिने घेऊन येथे आल्यावर दागिन्यांचे वजन कमी भरले. सोन्याचे हे दागिने 1.853 किलो इतकेच भरले. ही बाब त्यांना अस्वस्थ करून गेली, देवाच्या चरणी आपण केलेल्या दानात कसूर राहिली, अशी हुरहूर त्यांना लागली. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी त्या वजनापेक्षा जास्त सोन्या-चांदीचे दागिने नांदेडच्या गुरुगोविंदसिंगजी यांच्या चरणी अर्पण केले.
त्यांनी तब्बल चार कोटी रुपये किंमतीचे दागिने गुरुद्वाऱ्याला नुकतेच दान केले. 5,570 पेक्षा जास्त हिरेजडित एक कलगी, एक सोन्याचा हार असे दागिने पंजाबमधील डॉक्टरांनी गुरुद्वाऱ्यात अर्पण केले आहेत. यातील सोन्याचे वजन 2.853 किलो असून 5,570 हिरे, रत्न यात जडलेले आहेत. हे सर्व दागिने सोनार आणि हिरे घडवणाऱ्या कारागिरांनी अत्यंत मेहनतीने बनवले असून डॉक्टरनेही अत्यंत श्रद्धापूर्वक ते नांदेडमधील गुरुद्वाऱ्याच्या चरणी अर्पण केले आहेत.
मागील वर्षी आपण अर्पण केलेल्या दागिन्यात सोने कमी भरल्याची रुखरख या भाविकाच्या मनात होती. मात्र ही कसर भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नांदेडची वारी करत त्यापेक्षाही जास्त वजनाचे सोने, हिरे, जड-जवाहिरयुक्त दागिने अर्पण केले. देवाची कृपा असल्यामुळे आपले हॉस्पिटल खूप जोमात सुरु आहे. घरी समृद्धी नांदतेय, अशी कबूली या भाविकाने दिली. तसेच माझ्याजवळ देवाला देण्यासाठी आणखी काही नाही. जमीनदेखील नाही. फक्त देवानं जे मला दिलंय, त्यातलाच वाटा मी इथे अर्पण करतोय, अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली. पंजाबमधील या डॉक्टरांच्या दानशूरतेचे गुरुद्वारा समितीतर्फे कौतुक केले असून त्यांचे स्वागत करण्यात आले. पत्रकार परिषदेला बोर्डाचे सचिव स. रवींद्रसिंग बुंगई, बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंग वाधवा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻