ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई/ नांदेड- कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आठ दरोडेखोरांनी देवगिरी एक्सप्रेसमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी अनेक प्रवाशांना बेदम मारहाणही करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच पनवेलहून नांदेडकडे येणाऱ्या पनवेल एक्स्प्रेस रेल्वे गाडीवर कुर्डुवाडीनजिक दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नांदेडहुन औरंगाबादमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवरही दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी पहाटे साडे चार वाजता कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. दरोडेखोरांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे. नांदेडहून मुंबईकडे निघालेली देवगिरी एक्सप्रेस ही एक्स्प्रेस रेल्वे गाडी कसारा येथून कल्याण स्टेशनकडे जात असताना दरोडा टाकण्यात आल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना रेल्वेतीलच प्रवाशांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांना कळविल्यानंतर आठ आरोपींना पकडण्यात आले आहे. सर्व आरोपी औरंगाबाद भागातील रहिवासी आहेत. ते 19 ते 26 वयोगटातील आहेत. रोहित संजय जाधव, विलास हरी लांडगे, कपील उर्फ प्रकाश रमेश निकम, करण शेषराव वाहने, राहुल राजू राठोड, निलेश सुभाष चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन दरोडेखोर अल्पवयीन आहेत.
मंगळवारी पहाटे साडे चार वाजता देवगिरी एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकात आली. या एक्स्प्रेस गाडीने कसारा रेल्वे स्थानक सोडताच, एक-एक करीत अनेक जण डब्यातील एक प्रवासी साईनाथ यांच्याजवळ येऊन मला गांजा दे असे बोलू लागला. आपल्याजवळ गांजा नाही असे त्यांनी सांगताच, सर्वजण साईनाथ यांच्या भोवती जमले आणि त्यांना मारहाण करू लागले. एका दरोडेखोराने धारदार चाकू साईनाथ यांच्या मानेवर ठेवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने डब्यातील इतर प्रवासी घाबरले. आता आपण लुटले जाऊ या भीतीने कोणी प्रवासी काही बोलत नव्हता. त्यानंतर लगेच या दरोडेखोरांनी इतर प्रवाशांकडून पैसे, मोबाईल घेत लुटमार सुरू केली. कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार सुरू होता. दरोडेखोर कल्याण रेल्वे स्थानकात उतरतील असे प्रवाशांना वाटले. पण ते मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळेत या दरोडेखोरांनी अनेक प्रवाशांना मारहाण करीत त्यांना लुटले.
कल्याण स्थानक येताच डब्यातील प्रवासी पत्रकारसाईनाथ कांबळे यांनी दरोडेखोरांची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पथक तयार करुन दादर पोलिसांना माहिती देत, कल्याण ते दादर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सापळा लावून आठ दरोडेखोरांना अटक केली. यामधील दोन जण अल्पवयीन आहेत.
साईनाथ कांबळे यांच्या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दरोडेखोरांनी यापूर्वी इतर भागात दरोडे टाकले आहेत का? ही टोळी कधीपासून सक्रिय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या वर्षभरातील एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पनवेलहुन नांदेडकडे निघालेल्या रेल्वे गाडीवर कुर्डुवाडीदरोडा टाकून प्रवाशांना लुटण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा रेल्वेवर दरोडा टाकण्यात आल्याचा हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻