ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लोहा (जि. नांदेड)- मागील पंधरा दिवसांपासून लोहा शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरील पथदिव्यांची वीज जोडणी बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने तोडली. त्यामुळे अख्खे शहर गत पंधरा दिवसांपासून अंधारात चाचपडत आहे. तसेच भर उन्हाळ्यात सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विद्युत पंप मोटारीची वीज जोडणी तोडल्यामुळे शहरला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
या प्रकारानंतर लोहा पालिकेनेही पलटवार करत मालमत्ता कर थकबाकीपोटी महावितरण कार्यालयास दि. २३ रोजी दुपारी सील ठोकले आहे. मात्र महावितरणचे प्रमुख अधिकारी व पालिकेचे अधिकारी यांच्यात रात्री उशिरापर्यंत सदरील प्रकरणी तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू होती, पण तोडगा निघू शकला नसल्याचे वृत्त आहे.
मार्च अखेरीस आर्थिक वर्ष संपत आले असताना प्रत्येक कार्यालयाकडून हिशोबाचा ताळमेळ बसवून वर्षभराच्या जमा बाकीचा हिशोब करण्यात येतो. त्यादृष्टीने प्रारंभी लोहा महावितरण कार्यालयाचे लोहा पालिकेकडून ६ कोटी १० लाख रुपयांच्या वीज बिल थकबाकी थकविल्यामुळे पालिका हद्दीतील पथदिव्यांची तसेच सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विद्युत मोटारीची वीज जोडणी मागील पंधरा दिवसांपूर्वी तोडली आहे. त्यानंतर आता लोहा पालिकेनेही महावितरण कार्यालयाकडे जवळपास ८४ लाखांचा मालमत्ता कर थकल्याचे कारण देत आज दि.२३ रोजी दुपारी पालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या नेतृत्वाखालील पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकाने शिवाजी महाराज चौकातील महावितरण कार्यालयाच्या उपविभागीय अभियंता व शहर शाखा अभियंता या दोन विभाग कार्यालयांना सील ठोकले.
सदरील प्रकरणी महावितरणचे उपविभागीय अभियंता सचिन दवंडे, सहाय्यक लेखापाल कार्तिक जाधव, ग्रामीणचे अभियंता शिवाजी वाघमारे सह कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्याधिकारी पेंटे यांची भेट घेवून चर्चा केली व पालिकेने एका वर्षांचे वीज बिलाची थकबाकी द्यावी व महावितरणने एका वर्षांची मालमत्ता कराचा भरणा करावा असे ठरले मात्र पालिकेकडे निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे करत, केवळ पाच ते सहा लाख रुपयांची रक्कम भरू शकते असे नगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आल्याचे समजते. महावितरण कार्यालयाने सदरील रक्कम स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली असल्याने “लोहा शहर अंधारात आणि महावितरण सील” असेच चित्र दिसून आले.
महावितरणने पालिका हद्दीतील वीज जोडणी तोडल्यानंतर पालिकेकडून पलटवार करत “सिल अस्त्राचा” अवलंब करण्यात आला आहे. मात्र “सील अस्त्र” किती परिणामकारक ठरणार आहे, हे लवकरच कळेल.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻