ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहराच्या बायपास शिवनगर खंडोबा चौक परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि जवळपास बारा जिवंत काडतूसं जप्त केले आहेत. ही कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी तरोडा खुर्द परिसरात असलेल्या खंडोबा चौक परिसर भागात बुधवारी रात्रीच्या सुमारास केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तीन चोरटे पसार झाले.
शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पोलिसांनी शहरात अवैध अग्निशस्त्र रायफल वापर करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगारी वत्तीच्या व्यक्तींना अटक करण्यात सुरुवात केली आहे.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वच ठाणे प्रभारी रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात करत आहेत. भाग्यनगर पोलिसांची गस्त सुरु असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी तरोडा खुर्द परिसरातील खंडोबा चौक भागात शिव रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. पोलीस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन तिघेजण मात्र घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी रवि नारायणसिंग ठाकूर उर्फ लाला (वय 32) आणि आनंद यादव (वय 23) दोघे राहणार रविनगर, जुना कौठा नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, काही जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला. या दोघांना भाग्यनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या फिर्यादीवरून रवि ठाकूर आणि आनंद यादव यांच्यासह इतर तीन जणांविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे करत आहेत. भाग्यनगर पोलिसांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻