ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ पुणे- पुण्यातील काळेवाडी येथून एका वकिलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा आणि त्याचे प्रेत नांदेड जिल्ह्यातील राज्य सीमेवर जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील दोन आरोपींसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील काळेवाडी येथील कार्यालयातून एका वकिलाचे अपहरण करण्यात आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून आधी अपहरण आणि नंतर खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राजेश्वर गणपतराव जाधव (वय ४२, रा. आझाद कॉलनी, काळेवाडी, पुणे), बालाजी मारुती आयनलवार (वय २४), सतीश माणिकराव इंगळे (वय २७, दोघेही रा. भक्तापूर, पो. होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अॅड. शिवशंकर दत्तात्रेय शिंदे (वय ४५, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी, पुणे) असे अपहरण करून खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. शिंदे यांचे काळेवाडीतील विजयनगर येथे कार्यालय आहे. शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी ते बेपत्ता झाले. बराच शोध घेऊनही ते सापडत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देत घातपाताची शक्यता वर्तवली. तसेच नातेवाईकांनी रविवारी पहाटे वाकड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार राजेश्वर जाधव नामक व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
याचदरम्यान, अॅड. शिंदे यांच्या वर्णनाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नांदेड जिल्ह्याला लागूनच तेलंगणा राज्यात महाराष्ट्र सीमेवर आढळला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने तेलंगणा येथे धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन व घटनास्थळी आढळलेल्या एका वाहनावरून आरोपींचा माग काढायला सुरवात केली. आणि नांदेड परिसरातूनच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एका नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अॅड. शिंदे यांचा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजेश्वर जाधव याची नातेवाईक महिला वकिलाच्या कार्यालयात कामाला होती. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याचा राग मनात धरून आरोपीने वकिलाचे अपहरण केले. त्यासाठी पुण्यात चिखली येथून ड्रम खरेदी केले. हात-पाय बांधून वकिलाला ड्रममध्ये कोंबून टेम्पोतून आरोपी त्याच्या मूळ गावी भक्तापूर, नांदेड येथे घेऊन गेले. तेथे जाऊन ड्रम उघडले असता वकिलाचा मृत्यू झाल्याचे दिसले. त्यानंतर तेलंगणामध्ये त्याने मृतदेह जाळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीचा टेम्पो दिसून आला. त्यावरून माग काढून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. वकिलाचा खून केल्याची आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर, श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाधर चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, राम मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी व तौसिफ शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻