ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांची निवड करण्यात आली आहे. खतगावकर हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. दोन वेळा आमदार, दोन वेळा खासदार, एकवेळा राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या भास्करराव खतगावकर यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सातत्याने वर्चस्व राहिले आहे. दोन वेळा या बँकेचे अध्यक्ष राहिलेल्या खतगावकर यांनी यावेळी मोठ्या काळानंतर पुन्हा स्वतः अध्यक्ष म्हणून रिएंट्री केली आहे.
मागील काही वर्षापासून नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्याकडे हे पद होते. वसंतराव चव्हाण जुलै 2021 पासून या पदावर होते. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने कराराप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्याआधी मागच्या सहा महिन्यांपासून वसंतराव चव्हाण हे केव्हा राजीनामा देतील याकडे अनेकांचे लक्ष लागले होते, पण तशा हालचाली दिसून येत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी ते राजीनामा देणार नाहीत अशीही चर्चा सुरू असतानाच त्यांनी १५ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पद कोणाकडे जाणार याबाबत मोठी उत्सुकता होती. नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत काँग्रेसची एक हाती सत्ता आहे, त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मुखेडचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची नाव या पदासाठी चर्चेत होती. मात्र, अशोकराव चव्हाण यांनी अखेर माजी खासदार खतगावकर यांच्या नावाला पसंती दिली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा आज रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी खतगावकर यांच्याकडे आपला पदभार सोपविला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम, संचालक हरिहरराव भोसीकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यासह संचालक मंडळी उपस्थित होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻