ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
हिमायतनगर (जि. नांदेड)- तालुक्यात मागील ११ दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले हिमायतनगरचे तहसीलदार डी. एन. गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी आणि तालुक्यातील नाले, तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तर अनेक ठिकाणी शेतीपिके पूर्णतः पाण्याखाली गेली. जिल्ह्याच्या अनेक भागात ही स्थिती निर्माण झाली. यानंतर जिल्हाभरात प्रशासनाची धावपळ सुरू झाली. हिमायतनगरचे तहसीलदार डी. एन. गायकवाड यांनी हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह हिमायतनगर तालुक्यात विविध भागात पाहणी सुरू केली.
तालुक्यातील विविध गाव परिसर आणि नाल्याच्या पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानींची पाहणी करीत ते मंगरूळ ते खैरगाव परिसरात दाखल झाले. या ठिकाणी पाहणी करीत असताना गायकवाड यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुगालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻