ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ अर्धापूर- पेट्रोल पंपवर जमा झालेले नऊ लाख 54 हजार रुपये बँकेमध्ये भरण्यासाठी जाणाऱ्या व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून दुचाकी चोरट्यांनी त्यांच्याजवळील वरील रकमेची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यवस्थापकांनी बॅग सोडली नसल्याने चोरट्यांचा लुटीचा डाव फसला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील धामदरी पाटीजवळ ही घटना घडली. मालेगाव येथील भारतीय स्टेट बँकेत पेट्रोल पंप व्यवसायातून जमा झालेले 9 लाख 54 हजार 220 रुपये एका बॅगमध्ये टाकून दादाराव अशोक डाके हे आपल्या दुचाकीवरून जात होते. तेव्हा सकाळी दहाच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील धामदरी पाटीजवळ त्यांचा पाठलाग करीत एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु दादाराव डाके यांनी गाडीवरील ताबा न जाऊ देता हातातील बॅग सुटू दिली नाही आणि वेगाने तिथून गाडी काढत चोरट्यांना गुंगारा दिला. त्यामुळे चोरट्यांचा लुटीचा डाव फसला.
चोरटे बजाज कंपनीची पल्सर दुचाकी क्रमांक (एमएच३८- ०८९३) वर आले होते. दादाराव डाके यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवसे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻