ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मुक्रमाबाद पोलिसांची कारवाई
नांदेड/ मुखेड- सावरमाळ ( ता. मुखेड) येथील एका महिलेच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पैशाच्या देवाण घेवाणीतून वाद झाल्याने या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
मुखेड तालुक्यातील सावळी पाझर तलाव नजीक सावरमाळ शिवारातील खाज्यासाब पिंजारी यांच्या शेतातील पत्राच्या शेडसमोर अज्ञात आरोपीने एक ३५ वर्षीय महिलेस नेऊन तिचे डोके, चेहरा व पाठीवर दगडाने ठेचून खून केला होता. भर उन्हात चार दिवस प्रेत फुगून सडलेल्या अवस्थेत आल्याने दुर्गंधी निर्माण झाली. शेतकऱ्यांनी दि.१५ मे रोजी पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन पोलिस ठाणे मुक्रमाबाद येथे अज्ञात मारेकर्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या खून प्रकरणी तपासाअंती मयत महिला प्रेमला उर्फ इंदरबाई बापुराव भेंडेगावकर (रा. बेटमोगरा) असल्याचे स्पष्ट झाले. मयताची मोठी बहीण चंदरबाई व नातेवाईकांनी मयत महिलेच्या अंगावरील दागिने, मोबाईल व इतर साहित्य पाहून ह्या प्रेमला उर्फ इंदरबाई असल्याचे सांगितले. या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवाला आधारे मयताची बहिण चंदरबाई यांच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात केला.
फौजदार गजानन कांगणे हे तपास करीत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, सपोनि संग्राम जाधव, पोउपनि गोपीनाथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गजानन कांगणे यांनी तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहिती हस्तगत करुन खुनाचा गुन्हा झाल्यापासून केवळ तीनच दिवसात यातील नमुद आरोपी शंकर नामदेव खपाटे (वय ३६) व श्रीराम उध्दव पिटलेवाड (वय ३१) हे दोघे रा. बेटमोगरा यांना बेटमोगरा येथून ताब्यात घेऊन बेडया ठोकल्या.
पोलीसी हिसका दाखविताच खुनातील आरोपीने पोलिसासमक्ष मयत महिलेशी माझे अनैतिक संबंध तर होतेच, पण आर्थिक देवाघेवाणीतून झालेले वाद विकोपाला गेले होते. त्यातूनच मित्राच्या मदतीने सावरमाळ शिवारात महिलेचा दगडाने ठेचून खुन केल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरिक्षक गजानन कांगणे यांनी आपले कौशल्य पणाला लावून तपासाची चक्रे फिरवत महिला खून प्रकरणातील दोन्ही आरोपीस गुरुवारी दि. २६ मे रोजी बेटमोगरा (ता. मुखेड) येथून ताब्यात घेऊन अटक केले आहे. या खुनाच्या तपासकामी हवालदार गुणाजी सुरणर, माधव मरगेवाड, शरीफ पठाण, दिलीप तग्याळकर, चालक पांचाळ आदीने महत्त्वाची भूमिका निभावली. उल्लेखनीय बाब म्हणजे यापुर्वी सुध्दा हसनाळ येथील एका तरुणाचा खूनाचा उलगडा करुन तीन आरोपीना सपोनि संग्राम जाधव यांनी बेड्या ठोकल्या होत्या.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻