Sunday, December 22, 2024

पोलिसांचा संशयास्पद स्कॉर्पिओवर गोळीबार; ट्रक- जीप आडवी लावूनही मोटारसायकलला उडवत स्कॉर्पिओचा रात्रभर चालला थरार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ अखेर एकास अटक, काही जण फरार

नायगाव बाजार (जि. नांदेड)- अनेक प्रयत्न करूनही एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी थांबत नसल्याने रामतीर्थ पोलिसांनी या स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. ट्रक- जीप आडवी लावूनही मोटारसायकलला उडवत ही स्कॉर्पिओ रात्री पोलिसांना चकवा देत होती. अखेर नरसीजवळ ही गाडी पोलिसांच्या हाती लागली. या स्कॉर्पिओच्या चालकास अटक करण्यात आली असून काही जण फरार झाल्याचे समजते. दरम्यान, ही बाब कळताच जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नरसी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली. या स्कॉर्पिओच्या सर्व संशयास्पद बाबींचा कसून तपास सुरू केला आहे.

एक संशयित स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी नरसी येथून सुसाट निघाली होती. मात्र ती थांबवण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी पाठलाग केला. बिलोली व कुंडलवाडी पोलिसांनीही प्रयत्न केले, मात्र चालकाने पोलिसांना अजिबात दाद दिली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांनी गाडीच्या टायरवर गोळी झाडली. तरीही ती स्कार्पीओ नरसीच्या दिशेने निघाली शेवटी तळणी येथे संशयास्पद मुंबई पासींगची स्कॉर्पिओसह एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे गुरुवारी रात्री पेट्रोलींग करत असतांना बिलोली रोडवरील नरसी येथील शासकीय विश्रामगृहासमोर एम एच ०४ बि.क्यु. २४७९ या पासींगची स्कार्पीओ गाडी उभी असल्याचे दिसले. त्यांनी गाडी बाजूला घेण्यासाठी सांगितले. सदरच्या वाहण चालकाने गाडी बाजूला घेण्याचे सोडून बिलोलीच्या दिशेने सुसाट वेगात पळ काढला. गाडी बाजूला घेण्याऐवजी पळ काढल्याने संशय आला त्यामुळे दिघे यांनीही स्कॉर्पिओचा पाठलाग केला पण सापडत नसल्याने याची माहिती बिलोली पोलीसांना दिली.

बिलोली पोलिसांनी बिलोली येथे स्कॉर्पिओ अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही गुंगारा देवून कुंडलवाडीच्या दिशेने पळ काढला होता. कुंडलवाडी पोलिसांनी संशयित स्कॉर्पिओ थांबवण्यासाठी चक्क रोडवर ट्रक आडवा लावला होता. तरीही सुसाट स्कॉर्पिओ चालकाने तेवढ्याच वेगात पुन्हा मागे वळवून बिलोलीच्या दिशेने निघाला. कुंडलवाडी बिलोली रोडवर बिलोली पोलिसांनी ११२ क्रमाकांची मोटरसायकल आडवी लावून थांबवण्याचा प्रयत्न केला पण आडव्या लावलेल्या मोटारसायकला उठवून स्कार्पीओ परत नरसीच्या दिशेने निघाली. यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी स्कॉर्पिओ थांबवण्यासाठी टायरवर डोळी झाडली पण ती टायरला लागली नाही. त्यामुळे स्कॉर्पिओने नरसीकडे धुम ठोकली. सुसाट स्कॉर्पिओ नरसीकडे येत असल्याने रामतीर्थ पोलिसांनी नरसी चौकात नाकाबंदी केली, मात्र सदरची स्कार्पीओ नरसीकडे न येता बिलोली नरसी रोडवर असलेल्या तळणी गावात घुसवली. परंतु याठिकाणी स्कॉर्पिओ चालकाचा अंदाज चुकल्याने स्कॉर्पिओ एका खड्ड्यात अडकली.

मागावर असलेल्या रामतीर्थ पोलिसांनी तातडीने तळणी येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. यातील अन्य काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असल्याचे सांगण्यात येते.

या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नरसी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली व पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!