ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- ‘रघुकूल रित सदा चली आयी, प्राण जाए पर वचन ना जाए, हे आमचे हिंदुत्व’, त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये असे म्हणत राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला.
नांदेड शहरातील वाडी येथे नव्याने 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज मंगळवार दि. 10 मे रोजी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत पाटील, परभणीचे खासदार बंडु जाधव, कार्यक्रमाचे आयोजक तथा नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, महापौर जयश्री पावडे, वाडीच्या सरपंच अश्विनी लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, लोकसभा संघटक डॉ. मनोजराज भंडारी, भुजंग पाटील, प्रकाश मारावार, जयवंत कदम, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, रोहिदास चव्हाण, अनुसयाताई खेडकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, युवासेनेचे माधव पांडे, गजानन कदम व्यंकटेश मामीलवाड, महेश खेडकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडीच्या निकिता चव्हाण यांची उपस्थिती होती.
हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे मी राजकीय बोलणार नाही, जेव्हा राजकीय सभा होतील तेव्हा बोलेनच. पण सध्या काहीजण आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, पण त्याची आम्हाला गरज नाही, असे सांगत रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये हेच आमचे हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार उत्कृष्टरित्या काम करत आहे. सर्वच मंत्री क्रिकेट टीम मधील “बेस्ट ऑफ एव्हरीवन” असल्याचे काम करत आहेत. कोविडचा काळ जरी सुरू होता तरीही विकासाचे कामे हाती घेतली होती. त्या दरम्यानही आरोग्यसेवेसह सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. आघाडी सरकार विकासाला वेग देणारे सरकार असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळातही विकासाची गंगा वाहत ठेवू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला कोरोना काळात मोठा संघर्ष करावा लागला. दोन वर्ष चेहऱ्यावर मास्क आणि हाताची घडी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. यात आरोग्य सेवा, रूग्णालय, पूल, रस्ते आदी कामे हाती घेण्यात आली होती. सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील अधिवेशनात रायगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी 600 कोटी, दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती आणि तिसरे आता शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये देण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीनुसार हिंगोली जिल्ह्यात 100 कोटी रुपयांचा हळद प्रक्रिया उत्पादक प्रकल्प मंजुरी देण्यात आली आहे. नांदेडच्या गोदावरी नदीमध्ये येणाऱ्या नाल्यावर काम सुरू असून ते लवकरच मार्गी लागेल. नांदेडच्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना वाडी येथील या शंभर खाटांचे रुग्णालयाचा नक्कीच फायदा होणार आहे. जनतेसाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. विकासाला वेग देऊ, तुमचा सर्वांचा जर आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल तर येणाऱ्या काळात नक्कीच नवा महाराष्ट्र करू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
यावेळी उदय सामंत बोलताना म्हणाले की, विकास कामाचा भोंगा लावतो आम्ही राजकारणाचा नाही. आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष काम करून दाखवतात त्यांच्या नेतृत्वाखाली 100 खाटांचे रुग्णालय नांदेडकरांसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. या जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम चांगली असल्याने विकास थांबणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार हेमंत पाटील यांनीही कोररोना काळात दिल्ली सरकार केंद्र सरकार कोरोनावर मात मिळविण्यासाठी त्रस्त होते. तर इकडे महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट रुग्णसेवा असल्याने मृत्युदर खूप कमी राहिला. आघाडी सरकारवर आरोप करणे हेच फक्त विरोधकांची काम असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे वैभव कमी करण्याचे केंद्र सरकारचा काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी काही जिवंत उदाहरणे देऊन केंद्र सरकारच्या कामावर टीका केली. बुलेट ट्रेनची गरज नसताना यावरून राजकारण करणे, महागाई, बेरोजगारी हे विषय बाजूला ठेवून केंद्र सरकार व विरोधी पक्षाचे नेते मंडळी नको ते विषय हाताळत असल्याचा आरोप त्यांनी करत होऊ घातलेल्या नव्या रूग्णालयाला कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव द्यावे तसेच गोदावरी नदी शुद्धीकरण, माहूर आणि औंढा येथील पर्यटनसाठी मोठा निधी द्यावा अशी मागणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, माधव पावडे, कमलकिशोर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले. 57 कोटी रुपयाचे हे रुग्णालय नांदेडच्या वैभवात भर टाकणारे असून या उपक्रमाला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही ऑनलाइनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वांकडून कौतुक
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी या रुग्णालयासाठी शासकीय जागेवर अतिक्रमण असताना हे अतिक्रमण काढून रूग्णालयाला जागा उपलब्ध करून दिली. चांगले काम त्यांच्या कार्यकाळात झाले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनीही सहकार्य केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीनसह तीनही अधिकाऱ्यांचे व्यासपीठावरील मंत्री उदय सामंत, आदित्य ठाकरे, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी कौतुक केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻