ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
बाऱ्हाळी (ता. मुखेड, जि. नांदेड)- मुखेड तालुक्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुलीचे गावातील युवकासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून पित्याने पोटच्या मुलीला घरात कोंडून नंतर कोयत्याने वार करीत तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रातोरात तिचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. अखेर गावात चर्चेचे पेव फुटल्याने पोलिसांनी केलेल्या कसून तपासानंतर आईच्या तक्रारीवरून पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना मुखेड तालुक्यात घडली आहे.
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळीजवळ असलेल्या मनुतांडा येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत मुक्रमाबाद पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून या प्रकरणाचा छडा लावला. बुधवारी रात्री पोटच्या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या पित्यास मुक्रमाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईवेळी तांड्याला छावणीची स्वरुप आले होते.
मुखेड तालुक्यातील कृष्णवाडी लगत असलेल्या मनूतांडा (वडाचा तांडा ) मयत मुलीचे (वय १६) चुलत आत्याच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. यातूनच ती त्याच्याशीच विवाह करणार आग्रह करीत होती. मात्र मुलगा हा व्यसनाधीन असल्याचे सांगत मुलीच्या वडिलांनी या गोष्टीला तयार नव्हते. याबाबत मुलीस वडिलांनी वारंवार समजावून सांगितले. मात्र मुलगी ऐकत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आरोपी वडील अण्णाराव गोविंद राठोड (वय ४५) याने मुलीची राहत्या घरातच दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास तोंड दाबून ऊस तोडण्याच्या कत्तीने गळा चिरुण क्रुरपणे हत्या केली.
मुलीने मानसिक दबावातून फाशी घेतली आहे. असा बनाव करुन लगेच आरोपी पित्याने मुलीचा अंत्यसंस्कार केला होता. त्यामुळे संशयाची पाल चुकचुकत होती. ही घटना मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे इन्व्हिस्टीगेशन टीमसह पोलिसांचा ताफाचं घटनास्थळी तपासाकरिता दाखल झाला. तपासाकरिता कांही राख व हाडाचे नमुने घेण्यात आले.
या घटनेच्या संदर्भात अनेक गोपनीय जवाब मुक्रमाबाद पोलिसांनी नोंदविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पोउपनि गजानन काळे, पोउपनि गजनन कांगणे यांनी गोपनीय माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवत पुन्हा एकदा उलट जवाब नोंदविण्याकरिता दि. ९ ऑगस्टला तांड्यातील काही लोकांना ताब्यात घेतले.
त्यानंतर मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अण्णाराव राठोड याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ यासह आदी कलमान्वये मुक्रमाबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी अंमलदार माधव पवार, बब्रुवान लोगांरे, शौकत ताहेर, दिलीप तगळ्याकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻