ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळी झाडणाऱ्या मुख्य मारेकऱ्याचे नाव तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर रेकी करून घर दाखविणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. उज्जैन येथील दोघे जण आणि नांदेडचा एक जण अशा तिघांना न्यायाधीश बांगर यांनी 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीत येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नांदेड शहरातील शारदानगर भागात राहणारे संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर पाच एप्रिल रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी विशेष पथकाची स्थापना करून अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांना ही जबाबदारी दिली होती. त्यांच्यासमवेत वीस पोलीस अधिकारी आणि साठ पोलीस कर्मचारी असा कुमक देऊन तब्बल 55 व्या दिवशी या खुनाला वाचा फुटली.
पोलिसांनी सर्वप्रथम सहा त्याच्यानंतर तीन दोन आणि एक असे बारा आरोपी एकापाठोपाठ अटक केले. या सर्वावर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्याही सर्व पथकांनी याप्रकरणात समांतर तपास करून आरोपींना अटक केली आहे.
उज्जैन मध्यप्रदेश येथील दिल्लीच्या तिहार जेलमधून राजपालसिंग ईश्वरसिंग चंद्रावत आणि योगेश कैलासचंद्र भाटी या दोघांची बुधवार दिनांक 15 जून रोजी पोलीस कोठडी संपली होती. त्यापूर्वी अटकेत असलेला आरोपी गोलू मंगनाळे त्याचा मित्र रणजीत सुभाष मांजरमकर (वय 28) राहणार नांदेड याने मुख्य मारेकरी सुनील यास रेकी करून संजय बियाणी यांचे घर दाखवले होते असे तपासात निष्पन्न झाले.
बुधवारी वरील दोन्ही आरोपीसह रणजीत सुभाष मांजरमकर याला न्यायालयासमोर हजर केले. सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करत या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी 20 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य मारेकरी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकेल असा विश्वास तपासीक अंमलदार सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, पोलीस निरीक्षक संतोष तांबे आणि सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी सांगितले. या प्रकरणात आरोपींची संख्या बारावर पोहोचली असून शहरातील दोघेजण पोलिसांच्या ताब्यात असून त्यांचीही कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻