ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील हिंगोली- नांदेड रस्त्यावरील माळेगावजवळ फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा, मेंढ्या घेऊन येणाऱ्या आयशर ट्रकशी भीषण धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले असून तब्बल दीडशे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज गुरुवार दिनांक 25 मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडला.
कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव येथील विजय विलास हॉटेलसमोर फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला, राजस्थान येथून हैदराबादकडे मेंढ्या घेऊन निघालेल्या आयशर टेम्पो (एच आर ५५ एपी ३१११) ची भीषण धडक बसली. या धडकेत आयशरच्या कॅबिनमध्ये बसलेल्या पाच जणांपैकी तिघेजण जागीच ठार झाले, तर एकाचा नांदेडला रुग्णालयात आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातात मेंढ्या घेऊन निघालेल्या टेम्पोमधील तब्बल १५० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक रेखा शहारे व त्यांच्या इतर साथीदारांनी घटनास्थळ गाठले. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. तर मेंढ्याचा आयशर टेम्पो हा क्रेनच्या मदतीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी वाहतुकीचा बराच खोळंबा झाला होता. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻