ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई/ नांदेड – नांदेड जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आज सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर लगेचच चिखलीकर यांना लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित बातमी 👇🏻
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीमध्ये लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे भाजप नेते, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. प्रतापराव चिखलीकर हे भाजपचा नांदेड जिल्ह्यातील प्रमुख चेहरा असल्याने ही बाब नांदेड जिल्ह्यातील राजकारणात एक प्रकारे राजकीय भूकंप ठरली आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी त्यांचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली आहे. चिखलीकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडेच घेतला जाऊन चिखलीकर यांना सहजपणे उमेदवारी मिळेल असा सर्वांचाच कयास होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेला. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रतापराव चिखलीकर यांच्या उमेदवारीबाबत एक प्रकारची कोंडी निर्माण झाली. हीच कोंडी सोडविण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील सर्व नेत्यांनी चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकीत उतरविण्याचे निश्चित केल्याचे समजते. त्यानुसार चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांची उमेदवारीही जाहीर झाली आहे. यावेळी प्रविण पाटील चिखलीकर, गणेश पाटील सावळे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर झाली. यात चिखलीकर यांच्यासह सुनील टिंगरे, संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या यादीची घोषणा केली. बुधवारी अजित पवार यांनी ३८ जणांच्या उमेदवारीची पहिली यादी जारी केली होती. आता ७ उमेदवारांची यादी जाहीर झाली. एकूण ४५ उमेदवारांची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत करण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत कुणाला मिळाली उमेदवारी?
लोहा-कंधार – प्रताप पाटील चिखलीकर
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
अणूशक्तीनगर – सना मलिक
तासगाव – संजय काका पाटील
इस्लामपूर – निशिकांत पाटील
शिरुर – माऊली कटके
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻