ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ मुंबई– छोट्याशा गोष्टीचा बाऊ केला जात आहे. माझ्या सारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल जर कोणाला शंका येत असेल त्यांनी समोर येऊन बोलावं, इतक्या वर्षांपासून कायम काँग्रेस पक्षात काम करतोय. तरीही आमच्या निष्ठेबद्दल शंका आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. ज्यांना गटबाजी करण्याची सवय आहे, त्यांनी ती खुशाल करावी. आमच्या निष्ठेबद्दल आणि एकूणच घडलेल्या प्रकाराबद्दल पक्षातील सर्वोच्च नेते सत्यस्थिती जाणून आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
संबंधित बातमी 👇🏻
आमच्या भूमिकेबद्दल शंका घेणे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत अशी वेगळी काही भूमिका घेणे अशक्य आहे, अशी पुष्टीही अशोक चव्हाण यांनी जोडली. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला गैरहजर राहिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह 9 आमदारांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावण्यात आल्याचा प्रकारावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडतानाच खंत व्यक्त करीत संतापही प्रगट केला आहे.
छोट्या गोष्टीवरून मोठा गदारोळ केला जात असल्याचे सांगून अशोक चव्हाण म्हणाले की, आदल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी आम्ही मतदान केले होते. मग 24 तासांतच आम्ही अशी का आणि काय वेगळी भूमिका घेऊ शकणार होतो, असे काय वेगळे होणार होते? विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या दिवशी आम्ही काही मिनिटे उशीरा पोहोचलो, पण अध्यक्षांच्या आदेशानुसार सभागृहाची दारे बंद करण्यात आली. आम्ही लॉबितच अडकलो होतो व त्याचवेळी अध्यक्षांनी आम्ही पत्र लिहून आत येऊ देण्याबाबत विनंतीही केली होती.
मी अनेक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये असून अत्यंत निष्ठेने काम करतो आहे. माझ्याबाबत असे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. माझ्या कर्तव्यनिष्ठेबाबत शंका घेतली जाऊ नये आणि पक्षश्रेष्ठींनाही हे चांगले ठाऊक आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या वेळी ज्या आमदारांनी क्रॉस व्होटींग केले त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. पक्षाबाबत आपली कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, कोणाची पक्षाविरूध्द काही तक्रार असेल तर त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्याद्वारे प्रश्न सोडवला पाहिजे. तसेच अन्य प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अजुनही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना सोबतच आहेत व राज्यात महाविकास आघाडी कायम आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻