ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– सत्ताधाऱ्यांमधील वाद संपला असे वाटत असतानाच मुंबईतील या वादाचे लोण आता नांदेडपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. नांदेड शहरात “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच” चे बॅनर झळकले आहेत. या बॅनर मध्ये चक्क ‘खोके’चाही उल्लेख करण्यात आला आहे.
मागील चार दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जाहिरातीवरून धुसफूस सुरू आहे. तो वाद मिटत आला असे वाटत असतानाच नांदेडमध्ये आज शुक्रवारी शहराच्या आयटीआय चौकात “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र” असे बॅनर्स झळकवण्यात आले.
विशेष म्हणजे त्या बॅनर्सवर आर्य चाणक्यांचा फोटो आणि “50 खोके, 105 डोके” असा उल्लेख करण्यात आला आहे. बॅनर्स लावल्यानंतर शहरात राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. अनधिकृतरित्या लावलेले हे बॅनर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला समजताच त्यांनी लगेच काढून घेतले.
आता हे होर्डिंग लावले कुणी याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरीत अशा प्रकारचे बॅनर्स लावून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा होत आहे. याच नांदेड उत्तर भागातून शिंदे गटाचे बालाजीराव कल्याणकर हे आमदार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻