ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ औरंगाबादजवळील पोटूळ होम सिग्नलजवळील घटना
◆ नांदेड- पनवेल एक्सप्रेसमध्येही काही दिवसांपुर्वीच लुटीची घटना
नांदेड/ औरंगाबाद– मुंबईहुन नांदेडमार्गे आदिलाबादकडे निघालेल्या नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनोळखी चार चोरट्यांनी मारहाण करून लुटमार केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दगडफेक करून प्रवाशांना जखमीही केले आहे. आज शनिवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास औरंगाबादजवळील पोटुळ होम सिग्नलजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी चेन ओढून गाडी थांबवली आणि लुटल्याचेही सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद शहराच्या बीड बायपास परिसरात राहणाऱ्या सुनिता सुभाष भावे (वय 35) ह्या आपल्या कुटुंबियांसह प्रवास करत होत्या. मुंबईहून आदिलाबादकडे निघालेल्या नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये कोच S8 बोगीतील बर्थ नंबर 34, 10 वरून औरंगाबादकडे येत होत्या. नंदिग्राम एक्सप्रेस ही रात्रीच्यावेळी पोटूळ होम सिग्नल जवळ थांबली असता त्या डब्यामध्ये 20 ते 21 वयोगटातील चार अनोळखी चोरटे घुसले. चोरट्यांनी सुनीता भावे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व त्यांच्यासोबत असलेल्या सहप्रवासी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने चोरून पळ काढला. एवढेच नाही तर डब्यातील काही प्रवाशांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्यावर त्यांनी दगडफेक करुन जखमी केले.
हा प्रकार लोहमार्ग पोलीस औरंगाबाद यांना समजताच पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पगारे, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा बोईने आणि अन्य पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सकाळी सहा वाजता सुनिता भावे यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे हे करत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नांदेड- पनवेल एक्सप्रेसमध्येही लूट
नांदेडहुन लातूर, पुणे मार्गे पनवेलला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्येही काही दिवसांपुर्वीच लुटीची घटना घडली होती. कुर्डुवाडी स्टेशनजवळ निर्जन स्थळी रेल्वे थांबवून चोरट्यांनी प्रवाशांचे दागिने, पैसे आणि इतर ऐवज लुटला होता. ही घटना ताजी असतानाच आता औरंगाबाद मार्गावरही रेल्वेत लुटीची घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻