ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी दिली रात्री उशिरा भेट
नांदेड– राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सोमवार दि. 8 ऑगस्ट रोजी नांदेड व हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. अत्यंत धावपळीत झालेल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री हिंगोली दौरा आटोपून रात्री उशीरा नांदेडमध्ये आले. आणि त्यांनी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजता सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांनी श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे पूजाही केली.
रात्री उशीरा त्यांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानीही भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात नांदेड येथील मेळाव्याला उपस्थिती लावून विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर हिंगोलीकडे जात असताना रात्रीच काही अतिवृष्टीने बाधीत शेतीची त्यांनी पाहणी केली. तसेच काही शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्कही साधला. हिंगोली जिल्ह्यात कावड यात्रेला उपस्थित राहून आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊसलाही त्यांनी भेट दिली.
हिंगोलीतील मेळावा संपन्न झाल्यानंतर रात्री उशिरा औंढा नागनाथचे दर्शन घेऊन परत ते नांदेडकडे रवाना झाले. रात्री उशिरा म्हणजेच साडेबाराच्या सुमारास नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचा ताफा आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी थांबला. कल्याणकर यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी रात्री साडेबाराच्या सुमारास पोहोचले. तेथे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख, डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादा चिखलीकर, वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, जिल्हा विशेष शाखेचे साहेबराव नरवाडे, प्रशांत देशपांडे यांची यावेळी उपस्थिती होती. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने त्यांचा गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक शरणसिंग सोडी, सहाय्यक अधीक्षक ठाणसिंग बुंगई यांच्यासह गुरुद्वारा बोर्डाचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर आज मंगळवार दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री पावणे एक वाजता गुरु गोविंदसिंग विमानतळावरून मुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईकडे झेपावले. एकूणच रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांचा हा धावता दौरा चालला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻